हरित उर्जेवर आधारीत मोटारीची होणार निर्मिती ः 2030 पर्यंत 8 इलेक्ट्रिक दुचाकी आणण्याचे नियोजन
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
चारचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी आगामी काळामध्ये 6 इलेक्ट्रिक चारचाकी वाहने बाजारात आणणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शेणावर आधारित बायोगॅसवर कार निर्मिती करण्याची योजना कंपनीने आखली आहे.
मारुती सुझुकी कंपनी 2030 पर्यंत वर म्हटल्याप्रमाणे सहा इलेक्ट्रिक वाहने दाखल करणार आहे. हरित उर्जावर आधारित कारची निर्मिती कंपनी करण्यावर लक्ष देणार आहे. गायीच्या शेणापासून बनलेल्या बायोगॅस या इंधनावर चालणारी मोटर तयार करण्याची योजनादेखील कंपनीची आहे. सुझुकी मोटर कार्पोरेशन ही मारुती सुझुकीची सहकारी कंपनी असून 2070 पर्यंत 0 कार्बनचे लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जपान आणि युरोपमध्ये हे लक्ष साध्य करण्यासाठी 2050 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सदरच्या प्रकल्पासाठी कंपनी 2.82 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
आहे.
2024 मध्ये येणार पहिली इलेक्ट्रिक कार
सुझुकी मोटर कार्पोरेशन टोयोटा-सुझुकी यांच्या भागीदारीतून 6 इलेक्ट्रिक वाहने बनविण्याची योजना बनवित आहे. 2024 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही गाडी भारतात लाँच केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 2030 पर्यंत 5 कार्स भारतीय बाजारामध्ये उतरविल्या जाणार आहेत. नव्या दाखल होणाऱया कारच्या नावाबाबत मात्र कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुतीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आगामी कार्समध्ये वेगन आर, बलेनो, जिम्नी, ग्रँड विटारा यांचा समावेश असेल असे म्हटले जात आहे. अलीकडेच झालेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनामध्ये कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ईव्हीएक्स प्रदर्शित केली
होती.
2024 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणण्याची योजना
कंपनी मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक बाईक निर्मितीच्या कार्यामध्ये व्यस्त असून सदरची गाडी 2024 मध्ये सादर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2030 पर्यंत सुझुकीने अंदाजे 8 इलेक्ट्रिक दुचाकी सादर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सदरच्या दुचाकी भारतीय बाजारामध्ये सादर करण्याबाबत स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलेले नाही. याच दरम्यान ऑटो एक्स्पो 2023 मध्ये कंपनीने फ्लेक्स फ्यूल आधारित जिक्सर या गाडीचे सादरीकरण केले होते.