वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी येत्या काळामध्ये आपली नवी इर्टिगा कार बाजारात लाँच करणार आहे. सदरच्या कारकरिता बुकींग करायचे झाल्यास ग्राहकांना 11 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत.
मारुती सुझुकीच्या एका व्हिडिओ टिझरमध्ये नव्या गाडीची माहिती नुकतीच प्रकाशित करण्यात आली होती. कंपनीच्या माहितीनुसार सदरची नवी गाडी येत्या 15 एप्रिलला लाँच केली जाऊ शकते. सदरच्या गाडीचे प्रिबुकिंग सुरू झाले आहे. 11 हजार रुपये भरून गाडी ग्राहकांना बुक करता येणार आहे.
अनेकविध वैशिष्टय़े
सदरच्या गाडीला अनेक वैशिष्ठय़ांनी परिपूर्ण करण्यात आले आहे. हुड, क्रोम ग्रिल, बंपरवर फॉमलॅम्प आणि एक पॉवर अँटिना गाडीला दिला जाणार आहे. 15 इंचाच्या ऍलॉय व्हिलसह मागील बाजूस व्हिंडो व्हायपर आणि रॅप अराऊंड एलईडी टेल लाईट्स दिले गेले आहेत. त्यामुळे ही गाडी अधिक आकर्षक झाली आहे.
5 रंगात येणार गाडी
5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स याला देण्यात आला आहे. भारतामध्ये सदरची गाडी पाच रंगांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. पर्ल आर्टिक व्हाईट, मेटालिक सिल्की सिल्वर, पर्ल मेटालिक ऑबर्न रेड, पर्ल मेटालिक ऑक्सफोर्ड ब्ल्यू व मेटालिक मॅगमा ग्रे या 5 रंगात ही गाडी ग्राहकांना खरेदी करता येईल. यामध्ये सात जण बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या सुविधा
ऑटो क्लायमेट कंट्रोल, पार्किंग सेन्सर, किलेस एंट्री, अशा इतर सुविधाही या गाडीत असतील. 7.96 लाख रुपये ते 10.69 लाख रुपये (एक्स शोरुम) अशी गाडीची किंमत राहणार असल्याचे समजते.