वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी या चारचाकी निर्मिती कंपनीने आपली जून महिन्यातील वाहनांच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून विक्रीत वर्षाच्या स्तरावर 2 टक्के इतकी वाढ नोंदली गेली आहे. यासोबत ह्युंडाईने 50 हजार वाहन विक्रीचा टप्पा पार केलाय. कंपनीची कार विक्री जूनमध्ये वाढीसह 1 लाख 59 हजार 418 इतकी राहिली होती. मागच्या वर्षी जूनमध्ये कंपनीने 1 लाख 55 हजार 857 वाहनांची विक्री केली होती.
देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या विक्रीत मात्र कंपनीने मागच्या महिन्यात 8 टक्के वाढ नोंदवली असून 1 लाख 33 हजार 27 वाहने विक्री करण्यात कंपनीला यश आलंय. मागच्या वर्षी याच महिन्याची प्रवासी वाहनांची विक्रीची संख्या 1 लाख 22 हजार 687 इतकी होती. छोट्या कारच्या विक्रीबाबत पाहिल्यास आल्टो व एस प्रेसो यांच्या विक्रीत मात्र काहीशी घट नोंदवली गेली असून त्यांची विक्री 14 हजार 54 इतकी झाली आहे. दुसरीकडे कंपनीच्या स्विफ्ट, सेलेरियो, इग्नीस, बलेनो व डिझाइर यासारख्या कार्सच्या विक्रीत 17 टक्के घट (64 हजार 471 वाहनांची विक्री) जाणवली आहे. मध्यम आकाराच्या सेडन प्रकारातील सियाझने मात्र विक्रीत 1744 संख्येने खपत भाव खाल्याचे पाहायला मिळाले. कारण जून 2022 मध्ये सियाझची विक्रीसंख्या 1507 इतकी होती. यासोबत ग्रँड विटारा, ब्रिझा व इर्टिगा यांनीही 43 हजार 404 संख्येसह दुप्पट विक्रीची नोंद केलीय. नव्या बलेनो, स्विफ्ट व डिझाइर यांच्या सादरीकरणानंतर वाहनांना मागणी वाढती राहिली आहे. तर मारुतीच्या जूनमधील निर्यातीत मात्र 17 टक्के घट झाली असून कंपनीने 19 हजार 770 वाहनांची निर्यात केली आहे.
ह्युंडाईने विकल्या 50 हजार कार्स
ह्युंडाईनेही आपली जून 2023 मधील आकडेवारी जाहीर केली असून 50 हजार वाहनांची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. वर्षाच्या स्तरावर विक्रीत 2 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. क्रेटा, वेन्यू आणि ग्रँड आय 10 नियोस या कार्सनी विक्रीत वाढीसाठी चांगला हातभार लावला. दक्षिण कोरियातील या कंपनीने जून 2023 मध्ये 50 हजार 1 इतकी वाहने विक्री केली आहेत. ह्युंडाईने मागच्या महिन्यात 15 हजार 600 वाहनांची निर्यात केली असून यावर्षीच्या मेमधील निर्यातीपेक्षा हे प्रमाण 42 टक्के अधिक आहे.
मर्सीडिझची कामगिरी
मर्सीडिझ बेंझ इंडियाने जून 2023 मध्ये 25 हजार कार्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे इतक्या संख्येची कार विक्री कंपनीने थेट ग्राहकांना केली आहे. डायरेक्ट टू कस्टमर ही रिटेल ऑफ द फ्युचरअंतर्गत कंपनीची योजना 2021 मध्ये लाँच झाली होती, याअंतर्गत लक्झरी कार्सची खरेदी विक्रेत्याऐवजी थेट कंपनीतून करण्याची संधी ग्राहकाला असते.