2025 पर्यंत प्रशिक्षण देण्याचे ध्येय निश्चित
नवी दिल्ली ः देशभरात आगामी काळात कार निर्मितीमधील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड जवळपास लाखोजणांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे. सध्या देशभरात वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱया स्कूल्सची संख्या ही 500 झाली आहे. मात्र यामध्ये आगामी काळात वाढ करून वर्ष 2025 पर्यंत 25 लाख जणांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय निश्चित केल्याची माहिती आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मारुती ड्रायव्हिंग स्कूल (एमएसडीएस) ची सुरुवात 2005 मध्ये केली होती. 242 शहरांमध्ये यांची 500 अत्याधुनिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूल्स आहेत. यामध्ये 17 लाखापेक्षा अधिक जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे.
सुरक्षित वाहन चालविणे हाच उद्देश ः श्रीवास्तव
एमएसडीएससोबत जवळपास 1,500 प्रमाणित, योग्य व विशेष तज्ञ वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच आमचा उद्देश 2025 पर्यंत 25 लाखपेक्षा अधिकजणांना प्रशिक्षण देत मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूलच्या नेटवर्कचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मारुतीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली आहे.