नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची अनुभवी महिला मुष्टियोद्धा एमसी मेरी कोम हिला शुक्रवारी राष्ट्रकुल चाचणी लढतीतून माघार घ्यावी लागली असून यामुळे ती स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे. राष्ट्रकुल चाचणीत 48 किलोग्रॅम वजनगटातील चाचणी फेरीदरम्यान तिला पायाची दुखापत झाली.
सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली एमसी मेरी कोम 48 किलोग्रॅम वजनगटातील पहिल्या फेरीत दुखापतग्रस्त झाली. हरियाणाची नितू या गटात अंतिम फेरीत पोहोचली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही पात्रता स्पर्धा सुरु आहे.
2018 सुवर्णजेती मेरी पहिल्या बाऊटमध्ये दुखापतग्रस्त झाली. सलग दोन-तीन ठोसे पडल्यानंतर यातून सावरण्याच्या प्रयत्नात तिचा डावा पाय दुखावला. ती पुढे खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर रेफ्रीनी ही लढत थांबवली आणि नितूला विजयी घोषित केले. राष्ट्रकुल स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एमसी मेरी कोमने यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप व आशियाई स्पर्धेतून देखील माघार घेतली होती. मात्र, तिच्या या महत्त्वाकांक्षेला जोरदार धक्का बसला. यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा पुढील महिन्यात बर्मिंगहममध्ये खेळवली जाणार आहे.