विमानात मास्क न वापरल्यास संबंधिताचा प्रवास रोखण्याचेही निर्देश
@नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरी विमान वाहतूक नियामक मंडळाने (डीजीसीए) प्रवाशांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. डीजीसीएने एक परिपत्रक जारी करून स्थानिक पोलीस, सुरक्षा यंत्रणांची मदत घेण्याची आणि फेस मास्क न लावणाऱया प्रवाशांवर दंड आकारण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. तसेच इशारा देऊनही विमानातील कोणत्याही प्रवाशाने फेस मास्क घालण्यास नकार दिल्यास त्याला विमानातून खाली उतरवा, असे कडक निर्देशही देण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने 3 जून रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
एअरलाईन्स आणि विमानातील सर्व कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. यामध्ये फ्लाईट अटेंडंट, एअर होस्टेस, कॅप्टन किंवा पायलट तसेच हवाई प्रवाशांना मास्क घालण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रवाशांना अतिरिक्त मास्क हवे असल्यास एअरलाईन्स ते पुरवतील. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी वारंवार सूचना देऊनही प्रवाशांनी मास्क न वापरल्यास त्यांना खाली उतरवले जाईल. तसेच विमानाने उड्डाण घेतल्यानंतर नियम तोडल्यास डीजीसीएच्या निकषानुसार कारवाई करण्यात यावी. परिपत्रकातील नियमांनुसार एखाद्या विमान कंपनीला अशा प्रवाशांना काही कालावधीसाठी त्यांच्या एअरलाईन्समध्ये प्रवास करण्यास मनाई करण्याचा अधिकार आहे, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 3 जूनच्या आदेशानंतर डीजीसीएचे हे परिपत्रक आले आहे. डीजीसीएने सर्व विमानतळांना आणि विमानात तैनात असलेल्या सर्व कर्मचाऱयांना मास्क वापरण्याचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया प्रवाशांविरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी स्वतंत्र बंधनकारक सूचना जारी कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱया व्यक्तींना दंड ठोठावण्यात यावा किंवा नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले होते.