कोरोना खबरदारीसाठी मार्गसूची जारी : नववर्षाचा आनंद मध्यरात्री 1 पर्यंतच साजरा करता येणार
प्रतिनिधी /बेंगळूर, बेळगाव
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात खबरदारी घेतली जात आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी यासंबंधीची मार्गसूची जारी करण्यात आली आहे. कोरोना मार्गसूचीसंबंधी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये महसूलमंत्री आर. अशोक आणि आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी माहिती दिली.
शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे, बस, रेल्वे, विमान यासह सर्व सार्वजनिक ठिकाणी सक्तीने मास्क वापरावा. नववर्षाच्या स्वागताचा आनंद रात्री 1 पर्यंतच साजरा करता येणार आहे, असे मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. बंदिस्त जागेवरील कार्यक्रमांमध्ये मास्कची सक्ती आहे. नववर्षाच्या कालावधीत हॉटेल, रिसॉर्ट,
रेस्टॉरंट, पब, बारमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. मात्र, खबरदारी घ्यावी, असे मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारे कार्यक्रम आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर खबदरदारी घेण्याच्या सूचना मार्गसूचीद्वारे दिल्या आहेत.
31 डिसेंबर 2022 आणि नववर्षाच्या स्वागतासाठी 1 आणि 2 जानेवारी रोजी उत्सव वा कार्यक्रम मध्यरात्री 1 पर्यंतच साजरे करावेत. हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट, क्लब, रिसॉर्टस् आदी ठिकाणी विहित क्षमतेपेक्षा अधिक जणांना प्रवेश देऊ नये. तसेच येथे सर्वांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. या ठिकाणी 60 वर्षांवरील नागरिक, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिलांनी जाणे टाळावे, असा सल्ला मार्गसूचीद्वारे देण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी….
विदेशातून बेंगळूर आणि मंगळूर विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यासाठी मंगळूर आणि बेंगळूरमध्ये स्वतंत्र इस्पितळांची व्यवस्था करण्यात आली आहे. बेंगळूरमध्ये बौरिंग हॉस्पिटल आणि मंगळूरमध्ये वेनलॉक इस्पितळात उपचार केले जातील. प्रवाशांना स्वखर्चाने इतर खासगी इस्पितळांमध्येही उपचार घेता येतील, असे मार्गसूचीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विमानतळावर आगमनानंतर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांनी होम क्वारंटाईनमध्ये रहावे. सात दिवसांच्या कालावधीत त्यांनी फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात स्वच्छ धुवावे. क्वारंटाईन कालावधीत ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, चव आणि वास न समजणे यासारखी लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य विभागाला माहिती द्यावी. त्यानंतर त्याच्यावर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार केले जातील, असेही मार्गसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची मध्यम किंवा तीव्र लक्षणे असतील तर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील. त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येईल. या अहवालात त्याला कोरोनाच्या बीएफ 7 किंवा नवीन उपप्रकारांची लागण झाली आहे, हे स्पष्ट होणार आहे.
सुरक्षा उपाययोजना
बंदिस्त ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. अशा ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा फलक ठळकपणे प्रदर्शित करावा. सर्वांची थर्मल स्क्रिनिंगने तपासणी करावी. ज्यांना ताप, सर्दी किंवा श्वसनात त्रास होत असेल तर त्यांना वैद्यकीय उपचाराचा सल्ला द्यावा. बंदिस्त जागेवरील कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करावा. मोठ्या प्रमाणातील कार्यक्रमांच्या बाबतीत आयोजकांनी रुग्णवाहिका उपलब्धता तसेच रुग्णाला हलविण्यासाठी नजीकच्या हॉस्पिटलशी संपर्क साधावा. चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्यांना एन95 मास्क सक्तीचा आहे. प्रेक्षकाने हा मास्क घातलेला आहे का, याबाबतची खातरजमा तेथील कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे.