पत्नीसह तिघा जणांना अटक : मारिहाळ पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
मक्कळगेरी (ता. गोकाक) येथील गवंडी कामगाराच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर 24 तासांत मारिहाळ पोलिसांनी खून झालेल्या कामगाराच्या पत्नीसह तिघा जणांना अटक केली आहे. हे सर्वजण बेळगाव येथील राहणारे आहेत.
सोमवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी रमजान बशीरअहम्मद बेन्नी (वय 27, रा. मक्कळगेरी, ता. गोकाक) या कामगार तरुणाचा मृतदेह तुम्मरगुद्दी डोंगरावर आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. त्याचदिवशी रात्री मारिहाळ पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. मंगळवारी पत्नीसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
रमजानची पत्नी सना रमजान बेन्नी (वय 22, रा. मक्कळगेरी), महम्मदरजा नूरअहम्मद इनामदार (वय 24, रा. रुक्मिणीनगर), रोशनजमीर फिरोज शेख (वय 22, रा. असदखान सोसायटी, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. चर्चेसाठी म्हणून तुम्मरगुद्दी डोंगरावर नेवून रमजानचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. महम्मदरजाची सनाबरोबर मैत्री होती. त्यामुळे तिला रमजानपासून फारकत हवी होती. अनेकवेळा रमजानवर यासाठी दबाव आणण्यात आला होता. मात्र त्याने नकार दिला होता. सनाचे माहेर वैभवनगर येथे आहे. सध्या ती माहेरी आली होती. आपल्या पतीशी संपर्क साधून आपल्याला न्यायला या, असा निरोप दिला. त्यामुळे तो बेळगावला येत होता.
ही माहिती महम्मदरजाला मिळाली होती. त्याने रोशनजमीनला सोबत घेऊन कल्लाळ पुलाजवळ रमजानसाठी प्रतीक्षा केली. त्याला वाटेतच अडवून चर्चेच्या बहाण्याने तुम्मरगुद्दी डोंगरावर नेण्यात आले. दोघांमध्ये झालेल्या वादावादीनंतर रमजानच्या डोक्यावर दगड घालण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी बेळगावला येताना ही घटना घडली आहे.