Tarun Bharat

महाड एमआयडीसीमधील मल्लक कंपनीला भीषण आग

आगीनंतर झालेल्या स्फोटाने औद्योगिक परिसर हादरला

 प्रतिनिधी  / रायगड

महाड एमआयडीसी बुधवारी पुन्हा एकदा स्फोटाच्या दणक्याने हादरून गेली. येथील मल्लक स्पेश्नालिटी कंपनीला सकाळी भीषण आग लागली. या आगीनंतर कंपनीत स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता भयानक असल्याने सुमारे 8 कि.मी.च्या परिसराला दणके बसले. इमारतीचे तुकडे व लोखंडी तुकडेही 2 कि.मी. अंतरावर जावून पडले. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु असतानाच स्फोट झाल्याने कंपनीतील तसेच शेजारील कंपन्यांमधील असे एकूण तेराजण जखमी झाले.

  महाड औद्योगिक वसाहतीत पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणाऱया कारखान्यात सकाळी 10.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने कंपनीच्या एका प्लांटला क्षणातच विळखा घातला. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या कामगारांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याचवेळेस प्लांटमधील एका रिऍक्टरने पेट घेतल्यामुळे प्रचंड स्फोट झाला. स्फोटामुळे महाड औद्योगिक परिसर हादरला. स्फोटाच्या दणक्याने कंपनीच्या प्लांटची इमारत पूर्णपणे कोसळली. या कोसळलेल्या इमारतीचे तुकडे परिसरात जावून पडले. कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी व सिद्धार्थ या कंपन्यांच्या खिडक्या खळकन मोडून पडल्या. तर रिऍक्टरसह अन्य लोखंडी तुकडे सुमारे 2 कि.मी. अंतरापर्यंत उडाले. स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. कंपनीच्या 2 प्लांटला आगीने विळखा दिला. यामुळे आकाशात धुराचे लोट दिसत होते. आग लागताच कंपनीतील कामगारांनी कंपनीबाहेर धाव घेत सुरक्षितस्थळ गाठले. आग आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेणारे कामगार व महाड नगरपालिका, महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने प्लांटचा ताबा घेतला. मात्र याचवेळी स्फोट झाल्याने आग आटोक्यात आणणारे कामगार व परिसरातील कंपन्यांतील कामगारांनीही कंपनीबाहेर पळ काढला.

  आग आटोक्यात आणण्यासाठी महाड नगरपालिका, महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलासह खेड, रोहा, नागोठणे येथून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. 2 तासानंतर आग नियंत्रणात आणली गेली, मात्र ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी घातक रसायनांचा साठा व प्लांट असल्याने अग्निशमन दलाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला.

   ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी इथाईल ऑक्साईडचा प्लांट आहे. या प्लांटचे तापमान वाढू लागल्याने कंपनी प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. स्फोट झाल्यानंतर झालेल्या धावपळीत कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कामगार व शेजारील कंपन्यांमधील कामगार जखमी झाले. यामध्ये जवळपास 13 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. या तेराजणांवर महाड उत्पादक संघटनेच्या रुगणालयात उपचार करून सोडण्यात आले.

                         स्फोटाने परिसर हादरला

मल्लक स्पेशालिटी प्रा. लि. या कंपनीच्या प्लांटमध्ये आग लागल्यानंतर सुरूवातीला आग किरकोळ असल्याचे दिसत होते, मात्र या आगीत स्फोट झाल्याने इमारत कोसळली. इमारतीचे तुकडे जवळच असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी या कंपन्याच्या आवारात जावून पडले. स्फोटाच्या आवाजाने शेजारील कंपन्यांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या. तर महाड शहरातही स्फोटाचे हादरे जाणवले. शेजारील कंपन्यांतील कामगारांनाही कंपनीबाहेर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तर ज्या कंपन्यांना या स्फोटाचा दणका बसला, त्या कंपन्यांतील कामगारांनाही सोडून देण्यात आले. या स्फोटाच्या आवजाने काही अंतरावर असलेल्या जिते, टेमघर, नडगाव, बिरवाडी, कुसगाव, आसनपोई बिरवाडी आदी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांना घाबरून न जाण्याच्या सूचना देण्यात दिल्या. आग व स्फोटाने महाड औद्योगिक परिसर हादरून गेल्याची घटना घडताच महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह तहसीलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाच्या नव्या 46रुग्णांची भर

Patil_p

आरोग्य कर्मचारी भरती परीक्षा नियोजनात गोंधळ

Patil_p

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी सुरू

NIKHIL_N

शिवशंभू प्रतिष्ठान जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची नियुक्ती

NIKHIL_N

सोमय्यांनी संयमाने वागावे

Patil_p

इन्सुली कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पुल व रस्त्याचे भूमिपूजन !

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!