कोविडमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पूर्ववत भरली फेरी, पावसाने हजेरी न लावल्याने गर्दी वाढली, भरीव उलाढालीची नोंद
प्रतिनिधी /सांगे
सांगेतील मिलाग्रीस सायबीण चर्चचे फेस्त शनिवारी साजरे करण्यात येऊन त्या दिवसापासून फेस्ताची फेरी सुरू झाली आहे. हे फेस्त तमाम सांगेवासियांबरोबर आसपासच्या परिसरांतील लोकांमध्ये पावसाळय़ाची बेगमी करण्यासाठी पुरुमेताचे फेस्त म्हणून प्रसिद्ध आहे. गोव्यातील काही मोजकीच फेस्ते प्रसिद्ध असून सांगेतील हे फेस्त त्यापैकी एक आहे. शनिवार आणि रविवारी किंचित पाऊस पडला. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने फेरीमध्ये लोकांची गर्दी वाढतच गेली आहे. यंदा मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली असून उलाढालही बरीच झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोविडमुळे गेली दोन वर्षे फेस्ताची फेरी भरली नव्हती. त्यामुळे यंदा भरलेली फेरी तमाम लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. बुधवार हा फेरीचा शेवटचा दिवस जरी असला, तरी अजून काही दिवस फेरीतील दुकाने कायम राहणार आहेत. यावषी सांगे पालिकेने सुकी मासळी विकण्याची जागा बदलल्याने सुक्या मासळीच्या विपेत्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. बुधवारचा बाजार जेथे भरतो तेथे सुकी मासळी हलविण्यात आल्याने सांगेबाहेरील लोकांना ते खूपच अडचणीचे झाले आहे. सुक्या मासळीच्या विपेत्यांनी ग्राहकांविना नुकसान झाले असल्याचे बोलून दाखविले आहे. तसेच या विपेत्यांना अन्य ठिकाणी हलविल्याने इतर विक्रेत्यांवर देखील खूप परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
तयार कपडे, फर्निचर मोठय़ा प्रमाणात
यंदाच्या फेरीत तयार कपडय़ांची बरीच दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र त्या मानाने खरेदी कमी झाल्याचे दुकानदार बोलून दाखवत आहेत. फेरीत लाकडी फर्निचर मोठय़ा प्रमाणात आले असून सोफासेटची किंमत 25 ते 30 हजार, तर दिवाणची किंमत 15 हजारांच्या घरात आहे. लोक खास करून लग्नकार्यासाठी येथे फर्निचरची खरेदी करत असतात. बेगमीच्या साहित्यापैकी सुकी मिरची, मसाले, प्लास्टिक साहित्य, स्टील साहित्य, ताडपत्री, लोखंडी साहित्य, कोयता, आदोळी, भांडी, रगडे तसेच लहान मुलांची खेळणी आदींचा व्यवसाय चांगला झाला आहे. त्याचबरोबर शीतपेये, तहानलाडू, गोबी मंच्युरियन, भाजलेले चणे, शेंगदाणे, मिठाई यांचा आस्वाद लोकांनी घेतला.
विविध बाबींचा परिणाम
सुकी मासळीच्या विक्रीची जागा बदलल्याने शेवटपर्यंत मासळीविपेत्यांनी पालिकेच्या नावाने बोटे मोडली. याचा परिणाम सोपो गोळा करणाऱया ठेकेदारावर झाला. बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी झाली. पण वाढत्या महागाईमुळे दरही गगनाला भिडले आहेत. त्यातच यंदा काजूचे पीक कमी आल्याने लोकांच्या हातातील पुंजीवरही परिणाम जाणवला. यंदा पाऊस बराच आधी पडू लागल्याने ग्रामीण भागांतील महिला ओटंब, कोकमची आमसुले विक्रीसाठी घेऊन येत होती. त्याचाही परिणाम झाला.
सांगे व आसपासच्या भागांतून तसेच सांगेजवळच्या कर्नाटक राज्यातील भागांतून लोक मोठय़ा प्रमाणात बेगमीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी या फेस्ताच्या फेरीत येत असतात. सांगे भागातील व खास करून ग्रामीण भागांतील लोक काजूची विक्री करून पुंजी जमवून ठेवतात आणि त्यातून पुरुमेताचे सर्व प्रकारचे सामान खरेदी करत असतात. या फेरीत मोठय़ांबरोबर लहान मुलांसाठी करमणुकीचे स्टॉल्स राहिले. महिलावर्गासाठी तयार कपडे, इतर कापडी साहित्य, चादरी, बेडशिट, पिलो कव्हर, पायपुसणी, घरात लागणारे इतर साहित्य एकत्र मिळणे ही जमेची बाजू होती. फेस्ताच्या फेरीमुळे वाहतूक कोंडी होण्याचे किरकोळ प्रकार झाले. वाहने पार्क करण्याची मोठी समस्या होती. सांगे पोलीस स्थानकाचे निरीक्षक पाटील व त्यांच्या टीमने तसेच वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेवर चांगली देखरेख व चोख बंदोबस्त ठेवला.