ठाकरे गटाला ‘मशाल’ ः शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय देण्याचे निर्देश ः निवडणूक आयोगाचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची विभागणी केली असून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे. ठाकरे गटाला निवडणूक निशाणी म्हणून धगधगती ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाने मागणी केलेली चिन्हे आयोगाने रद्द ठरवली असून नव्याने तीन पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट झाले असले तरी ‘सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असाच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. आयोगाने दोन्ही गटांनी मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही चिन्हे बाद ठरवली आहेत. ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला आयोगाने दिला आहे. तथापि हे चिन्ह केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतचा निर्णय अत्यंत घाईगडबडीत घेऊन ते गोठवण्यात आले आहे. आपल्याला बाजू मांडण्याचीही संधी दिली गेली नाही, अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटाने केली आहे. तर शिंदे गटानेही यासंबंधी कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या विषयावर पडदा पडला असला तरीही पक्ष, निवडणूक चिन्ह याचा वाद आणखी ताणला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात
आहे.
आधी ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट
निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.
पहिल्याच प्रयत्नात उद्धवजी जिंकले ः भास्कर जाधव
शिवसेना गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत. आम्हाला मिळालेल्या नावामध्ये उद्धव, बाळासाहेब आणि ठाकरे ही तिन्ही नावे आहेत. त्याचबरोबर आम्ही जी निवडणूक निशाणी मागितली होती ती धगधगती मशालही पहिल्याच प्रयत्न मिळाली आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. शिवसेनेची मशाल यापुढेही धगधगती राहील, असेही आमदार भास्कर जाधव म्हणाले.
आम्हाला हेच नाव हवे होते ः भरत गोगावले
शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना हेच नाव आम्हाला पाहिजे होते. या नावात आम्ही समाधानी आहोत. याच नावाने आम्ही लोकांसमोर जाऊ. आता कोणतेही चिन्ह मिळाले तरी हरकत नाही. यापुढे शिंदे गट नसून बाळासाहेबांची शिवसेना हाच आमचा पक्ष असेल. परंतु या नावाबाबत कोणी कोर्टात गेले नाही तर आम्हाला हे नाव कायमस्वरुपी मिळेल. आणि भविष्यात धनुष्यबाण हे चिन्हदेखील मिळेल, याची खात्री आहे. कारण सध्या दिलेले चिन्ह हे फक्त पोट निवडणुकीपुरते असल्याचे ते म्हणाले.
शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडूनही कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. याविषयी आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय दिला जाऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने केली आहे. ठाकरे गटाच्या या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पडताळणीनंतर दोन्ही गटांना नावे प्रदान
सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्यावतीने निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावासाठी कागदपत्रे जमा करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने बैठक घेऊन कायदेशीर बाबींची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे. दोन्ही गटातील दुसरे पर्याय आयोगाने मान्य केले आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव तर शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे.
शिंदे गटाचे चिन्हवाटप रखडले
उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्रिशूल तर शिंदे गटाने गदा या चिन्हाची मागणी केली होती. तथापि निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हे ही धार्मिक असल्याने देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाकडून मागणी केलेल्या उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडूमधील एका पक्षाचे असल्याने ते देता येणार नसल्याचे सांगितले. परिणामी तिसरा पर्याय असलेले ‘मशाल’ चिन्ह ठाकरे गटाला देण्यात आले आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा ही चिन्हे दिली होती. परंतु गदा आणि त्रिशूल देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर उर्वरित उगवता सूर्य हे एकच चिन्ह शिल्लक होते. मात्र तेही देता येत नसल्याने निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गट आता कोणते चिन्ह निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.