प्रतिनिधी /कुडचडे
कामराळ, कुडचडे येथे काही दिवस अगोदर सुरू असलेल्या रेल्वे बांधकामासाठी आणलेले सामान चोरल्याप्रकरणी हनुमंत अनिल व अब्दुल कादर शेख मुजावर या दोन संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामराळ येथे रेल्वे कंत्राटाद्वारे बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळ्या गायब होत असल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यानुसार निरीक्षक वैभव नाईक यांची तपासकार्य सुरू करून रविवारी दोन्ही संशयितांना अटक करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. चोरी करण्यात आलेल्या मालाची किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार रु. इतकी नोंद करण्यात आली असून सदर माल ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती कुडचडे पोलिसांनी दिली.