ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackreay) यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर (matoshree) हनुमान चालीसा (hanuman chalisa) पठण करण्यावर खा.नवनीत राणा (navneet rana) आणि आ. रवी राणा (ravi rana) ठाम आहेत. काही वेळापूर्वीच या दाम्पत्याने खारमधील घरात हनुमानाच्या पाया पडून मातोश्रीवर जाणार असल्याचा एल्गार केला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या 200 ते 300 शिवसैनिकांनी बॅरिकेट्स तोडून राणा यांच्या खारमधील इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी राणांच्या घरात दाखल झाले आहेत.
शिवसैनिकांनी राणा यांच्या खारमधील घराला घेराव घातला आहे. त्यांना बाहेर पडू न देण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न आहे. त्यावर राणा दाम्पत्याने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये घरातील हनुमानाच्या पाया पडून आम्ही मातोश्रीवर जाणारच असा एल्गार त्यांनी केला आहे. तसेच आम्ही या घरातून बाहेर पडणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असणार आहे, असंही रवी राणांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
राणा दाम्पत्य सकाळी 9 वाजता मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार होतं. मात्र, शिवसैनिकांनी त्यांच्या खारमधील घराला घेराव घातल्याने राणा दाम्पत्य बाहेर पडत नसल्याचे दिसून येते. आक्रमक शिवसैनिकांनी त्यांना इशारा दिला आहे, एकतर तुम्ही घराबाहेर या नाहीतर आम्ही घरात येतो. त्यामुळे येथे काहीसा तणाव निर्माण झाला असून, पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीबाहेर राज्यभरातील शिवसैनिक दाखल झाले आहेत. त्यांनीही राणांना मातोश्रीबाहेर येऊनच दाखवावे. आम्ही त्यांना प्रसाद देऊ, असा धमकीवजा इशारा दिला आहे.