वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला आगामी पाक आणि भारताविरुद्धच्या वनडे मालिकांना प्रकृती नादुरुस्तीमुळे मुकावे लागणार आहे. हेन्रीला पोटाच्या स्नायूची दुखापत झाल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले. न्यूझीलंड संघाने पाकच्या दौऱयात कसोटी मालिका अनिर्णित राखली आहे.
पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील कराचीत झालेल्या दुसऱया कसोटी सामन्यात खेळताना मॅट हेन्रीच्या पोटाचा स्नायू दुखावला गेला होता. या दुखापतीमुळे त्याला सातत्याने वेदना जाणवू लागल्या. वैद्यकीय इलाज करवून घेण्यासाठी तो तातडीने मायदेशी रवाना झाला. ही मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात दाखल होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका 18 जानेवारीपासून खेळवल्या जातील.