विद्यार्थ्यांनी तयार केलेले 150 उपग्रह प्रक्षेपित
वृत्तसंस्था/ चेंगलपट्टू
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन आणि स्पेस झोन इंडियाच्या सहकार्याने मार्टिन फौंडेशनने तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्हय़ातील पट्टीपोलम गावातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रॉकेट मिशन रविवारी प्रक्षेपित केले आहे. 100 हून अधिक शासकीय शाळांमधील 5 हजारांहून अधिक विद्यार्थी या रॉकेट प्रकल्पात सहभागी होते. या मोहिमेच्या माध्यमातून देशाच्या विविध हिस्स्यांमधील 6-8 वीपर्यंतच्या 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना 150 पीआयसीओ उपग्रहांना डिझाईन आणि विकसित करणे शिकविण्यात आले आहे.
निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून उपग्रह तंत्रज्ञानाविषयी शिकविण्यात आले. या 150 पीआयसीओ उपग्रहांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. या प्रक्षेपणावेळी तेलंगणाच्या राज्यपाल तमिळसाई सुंदरराजन उपस्थित होत्या. मोहिमेने निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणिताविषयी विस्तृत ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे.
मार्टिन फौंडेशन ही तामिळनाडूतील एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने प्रकल्पासाठीचा 85 टक्के खर्च उचलला आहे. 100 हून अधिक शासकीय शाळांचे एकूण 2 हजार विद्यार्थी रॉकेट प्रकल्पाचा हिस्सा राहिले आहेत. या विद्यार्थ्यांना अंतराळशास्त्रात प्रशिक्षित करणे आणि या क्षेत्रात कारकीर्द घडविण्याच्या संधी शोधण्यात मदत करण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ ठरण्याची अपेक्षा आहे.
स्पेस झोन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉ. आनंद मेगालिंगम यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेईकल मिशन 2023 अंतर्गत एक हायब्रिड रॉकेट आणि 150 पिकोसॅट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच हा पहिला हायब्रिड रॉकेट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.