Tarun Bharat

बलसागर भारत होवो…

Advertisements

जगातील सर्वांत मोठे लोकशाहीप्रधान राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा भारत  आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून, हा टप्पा देशातील प्रत्येक नागरिकासाठी निश्चितच अभिमानास्पद व आनंददायी म्हणावा लागेल. मागच्या सात, साडेसात दशकांमध्ये भारताने काय कमावले, काय गमावले, यावर यंदाही ऊहापोह होत राहील. किंबहुना, तटस्थपणे याचे विश्लेषण केल्यास सामर्थ्यशाली, विकसित भारताच्या दिशेने आपली निरंतर वाटचाल सुरूच आहे, असे नक्कीच म्हणता येते. खरेतर भारतीय स्वातंत्र्यलढा हेच जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य ठरते. त्याचे कारण त्याला लाभलेले नैतिक मूल्यांचे अधिष्ठान होय. सविनय कायदेभंग, सत्याग्रह, असहकार, अहिंसा असे कितीतरी शब्द (विचार) महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या स्वातंत्र्यलढय़ाने जगाला दिले. लोकमान्यांच्या ‘स्वराज्य मंत्रा’ने दिलेली प्रेरणा, महात्मा गांधींचा ‘चले जाव’चा नारा, त्यातून देशाच्या कानाकोपऱयातील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचलेली लढय़ाची धग, नेताजी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेचा पराक्रम अन् ज्ञात-अज्ञात क्रांतिकारांचे बलिदान असे या लढय़ाचे अनेकविध पैलू सांगता येतील. या स्वातंत्र्यलढय़ाला यश आले अन् 15 ऑगस्ट 1947 ला भारत हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे उदयास आले. त्याची पंच्याहत्तरी हा तसा दीर्घ टप्पाच ठरावा. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या प्रत्येक पंतप्रधानाने या देशाच्या प्रगतीत, उन्नतीत मोलाचे योगदान दिले आहे. पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या देशाला पुन्हा उभे करण्याचे आव्हान तसे हिमालयाएवढेच. परंतु, नेहरू यांनी ते लीलया पेलले. नेहरू काळात अनेक संस्थांची उभारणी झाली, पायाभूत सुविधा, लोककल्याणकारी योजनांची मुहूर्तमेढ रोवली गेली. विशेष म्हणजे लोकशाहीच्या मंदिराची पायाभरणी याच कालखंडात झाली. अलिप्त व तटस्थ राष्ट्र म्हणून देशाला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम पंडितजींनीच केले. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा देत या दोन्ही आघाडय़ांवर भर दिला. तर इंदिरा गांधी यांनी हरित क्रांती घडविण्यासह बँकांच्या राष्ट्रीयीकरणासारखे निर्णय घेतले. पाकिस्तानला अद्दल घडवत बांग्लादेशची निर्मिती करण्यासही त्या कारणीभूत ठरल्या. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचा उल्लेख ‘दुर्गा’, असा करणे, यातच सारे आले. इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी यांनी संगणकाचे महत्त्व जाणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक वातावरण तयार केले. त्यातूनच या क्षेत्राकरिता अवकाश प्राप्त होऊ शकला. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मंडल आयोगाची शिफारशी लागू करण्याचा धाडसी निर्णय घेतला व त्यातून वंचित घटकांना सार्वजनिक क्षेत्रात नोकऱयांसाठी राखीव कोटा मिळू शकला. पी. व्ही. नरसिंहराव यांची कारकीर्दही ऐतिहासिक ठरावी. पंतप्रधान नरसिंहराव व अर्थमंत्री मनमोहनसिंग या जोडगोळीने आर्थिक क्षेत्रात घेतलेल्या धाडसी भूमिका दूरगामी ठरल्या. याच काळात देशाने खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. तेव्हापासूनच परकीय गंगाजळी आटलेल्या भारताचा वारू अर्थक्षेत्रात दौडू लागला, असे मानले जाते. विविध विचारधारेच्या पक्षांना सोबत घेत सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करण्याबरोबरच जनमानसातील आपले स्थान टिकवून ठेवणाऱया अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरण अणूचाचणी, कारगील युद्धातून आपल्यातील कणखरतेचे दर्शन घडविले. डॉ. मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्दही वैशिष्टय़पूर्ण होय. जगाच्या अर्थकारणाचा दांडगा अभ्यास असणाऱया डॉ. मनमोहनसिंग यांनी आर्थिक आघाडीवर देशाला भक्कम केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच या क्षेत्रात देशाला क्रांतिकारक काम करता आले. 2008-9 मध्ये संबंध जग मंदीने ग्रासलेले असतानाही भारतासारखा देश या संकटापासून सुरक्षित राहिला, तो मनमोहनसिंग यांच्या धोरणांमुळेच. मागच्या आठ वर्षांपासून देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहेत. पोलादी नेतृत्व व भ्रष्टाचारमुक्त सरकार, हे मोदी यांचे सर्वांत मोठे यश मानायला हवे. एकूणच मागच्या साडेसात दशकात ज्यांनी देशाचे नेतृत्व केले, त्यांना कमी अधिक कालावधी मिळाला असेलही. तथापि, त्यातही वेगवेगळय़ा स्तरावर योगदान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे नाकारता येत नाही. यातील काही निर्णय वादग्रस्त ठरले असतील. त्यांच्या वेगवेगळय़ा भूमिकांविषयी मतमतांतरेही असू शकतात. असे असले, तरी देशाचा गाडा पुढे नेण्यात त्यांची भूमिका सहाय्यभूत ठरली, हे मान्य करावे लागते. काँग्रेसच्या काळात गरिबी हटावचा नारा दिला गेला, भाजप काळात काळा पैसा परदेशातून परत आणण्यासह 15 लाख खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले गेले. या आश्वासनांचे पुढे काय झाले, सर्वच जाणतात. बाकी काही असो. आगामी काळात लोकशाही बळकट करण्यासाठी व जनकल्याणकारी कामांकरिता सत्ताधारी व विरोधक यांनी एकत्र यायला हवे. सत्ताधाऱयांच्या चांगल्या कामांना चांगले म्हणण्याची दानत विरोधकांनी दाखविली पाहिजे, तर विरोधकांना संपविण्याची भाषा करण्याऐवजी लोकशाहीसाठी हाही घटक आवश्यक असल्याची जाणीव सत्ताधाऱयांनी ठेवावी. आज महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आ वासून उभे आहेत. म्हणूनच भावनिक मुद्दय़ांऐवजी लोकांच्या प्रश्नांवर मूलभूत काम व्हावे. यंदा देशभर ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविला जात आहे. तिरंगा हे त्यागाचे, समत्वाचे, शांततेचे प्रतीक आहे. या तत्त्वांचे पालन करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. देशापुढे चीन, पाकच्या कुरापतींसह आर्थिक, सामाजिक अशी अंतर्गत व बाहय़ स्वरुपाची कितीतरी आव्हाने आहेत. यातून तरण्यासाठी साने गुरुजींच्या

हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून…

ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया हो…

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो…

या कवितेच्या ओळीप्रमाणे एकोपा राखावा लागेल. त्यातूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱय्ाा अर्थाने उजळून निघेल.

Related Stories

आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

Patil_p

हे कृष्णकथा अलोलिक

Patil_p

संत सोहिरोबानाथ आंबिये जन्मस्थळ तीर्थक्षेत्र बनावे

Patil_p

जपानमधील वर्ण व वंशवाद

Patil_p

परीक्षा दहावीच्या परीक्षेचीच …

Patil_p

भारतातल्या वाढत्या भूस्खलनाच्या दुर्घटना

Amit Kulkarni
error: Content is protected !!