गावजेवण घालणाऱ्या आक्काताई लंगोटी यांचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही आशीर्वाद
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या पैशातून गावाला पुरणपोळीचे जेवण घालणाऱ्या सुटट्टी, ता. रायबाग येथील आक्काताई लंगोटी यांचा सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. आक्काताई यांनी मुख्यमंत्र्यांना पुरणपोळी भरवून तुमच्यावरील संकटे दूर होवोत, असा आशीर्वाद दिला. विविध कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते. आपला दौरा आटोपून बेंगळूरला परतण्यापूर्वी सांबरा विमानतळावर आक्काताई लंगोटी व त्यांच्या सहकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. म्हैसूरी फेटा, फलपुष्प व साडी देऊन आक्काताई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व काँग्रेस नेते उपस्थित होते. आम्ही महालक्ष्मीचे पूजन केले आहे. तुमच्यावरील संकटे दूर होवोत, अशी प्रार्थना केली आहे. तुम्ही असेच राज्य कारभार करत जा, तुमच्या हाताला यश येवो, असा आशीर्वाद आक्काताई व इतर महिलांनी दिला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही दोन्ही हात जोडून आक्काताईंना नमस्कार केला. काँग्रेस सरकार असेपर्यंत गृहलक्ष्मी योजना थांबणार नाही. दर महिन्याला तुमच्या खात्यात रक्कम जमा होत राहणार आहे. तुमचा आशीर्वाद असाच राहू दे, अशी विनंती केली.