वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 साली पॅरिसमध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नेमबाजी या क्रीडा प्रकारात क्रोएशियात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ) विश्व चॅम्पियनशीप शॉटगन स्पर्धेत भारताच्या वरि÷ नेमबाजांना पदकांनी हुलकावणी दिली.
क्रोएशियामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या कोटा पद्धतीनुसार स्थान मिळविण्यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. भारताच्या पुरुष आणि महिला स्कीट नेमबाजांनी या पात्रफेरीच्या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला. रविवारी झालेल्या या स्पर्धेत भारताच्या सहा स्पर्धकांना पदकांनी हुलकावणी दिली. महिलांच्या विभागात स्कीट नेमबाज माहेश्वरी चौहानने 125 पैकी 113 गुण नोंदवित 29 वे स्थान तर दर्शना राठोडने 125 पैकी 112 गुण तसेच रेझा धिल्लॉने 110 गुण नोंदवित 35 वे स्थान मिळविले. पात्रतेसाठी आठवे स्थान मिळविण्याकरिता 119 गुणांची जरुरी होती. पण भारतीय स्कीट महिला नेमबाजांना हा टप्पा गाठता आला नाही.
पुरुषांच्या विभागात भारताच्या गुरज्योत खेंगुराने 117 गुण नोंदवित 51 वे स्थान, मिराज अहमद खानने 117 गुण नोंदवित 54 वे तर अनंतजित सिंग नेरुकाने 116 गुण नोंदवित 65 वे स्थान मिळविले. अंतिम पात्रतेसाठी 122 गुण नोंदविणे जरुरीचे होते. 2022 ची आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनची शॉटगन विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून ओसीजेक (क्रोएशिया) येथे प्रारंभ झाला असून ही स्पर्धा 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.