सशस्त्र दलात सेवा बजाविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाच्या बेळगाव येथील दुसऱ्या बटालियनमध्ये सेवा बजाविणाऱ्या 579 अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरित करण्यात आले आहे.
देशभरातील सशस्त्र दलात सेवा बजाविणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ‘नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट’ या घोषवाक्यांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी 24 मार्च रोजी राज्य राखीव दलाच्या दुसऱ्या बटालियनमध्ये हा कार्यक्रम झाला.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, राज्य राखीव दलाच्या कंग्राळी येथील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रमेश बोरगावी, दुसऱ्या बटालियनचे कमांडंट हमजा हुसेन आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. फेब्रुवारीमध्ये उत्कृष्टपणे सेवा बजाविलेल्या तिघा अधिकाऱ्यांना उत्तम पोलीस अधिकारी असे प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांचाही सत्कार करण्यात आला. पोलिसांसाठी संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. आगामी विधानसभा निवडणूक बंदोबस्तासाठी पोलिसांनी सज्ज रहावे. निवडणुकीच्या काळात उत्तमरित्या कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी सेवा बजावावी, असे आवाहन कमांडंट हमजा हुसेन यांनी केले.