मध्यप्रदेशमध्ये तीन पुस्तकांचे प्रकाशन : केंद्रीय मंत्री अमित शाह यांची उपस्थिती
भोपाळ / वृत्तसंस्था
देशात प्रथमच मध्यप्रदेशात एमबीबीएस हिंदीतून शिकवले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भोपाळमध्ये या अभ्यासक्रमासंबंधीच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन केले. याप्रसंगी बोलताना हा क्षण देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनर्रचनेचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवराज सिंह यांनी सर्वप्रथम हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करून पंतप्रधान मोदीजींची इच्छा पूर्ण केल्याचेही ते पुढे म्हणाले. काही दिवसांनी अभियांत्रिकीचे शिक्षणही हिंदीतून सुरू होईल. त्यासाठी अभ्यासक्रमाच्या अनुवादाचे काम सुरू झाले आहे. सहा महिन्यांनंतर हिंदीमध्ये पॉलिटेक्निक आणि इंजिनीअरिंग शिकण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
देशात आता एमबीबीएसचे शिक्षण हिंदीतून दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके हिंदीत तयार करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये तीन पुस्तकांचे प्रकाशन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा उपस्थित होते.
पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात मुलांच्या मातृभाषेला महत्त्व देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशात सर्वप्रथम हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करून शिवराज सिंह सरकारने पंतप्रधान मोदींची इच्छा पूर्ण केली आहे. भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या काळात जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. देशातील शिक्षण क्षेत्राच्या नवजागरणाचा हा क्षण आहे, असे गौरवोद्गार अमित शाह यांनी काढले.
प्रादेशिक भाषांना शिक्षणात प्राधान्य
मी देशातील विद्यार्थ्यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधानांनी मोदींनी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली या सर्व भाषांमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देण्याचे आवाहन केले आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली नव्या शैक्षणिक धोरणातून प्रादेशिक भाषांना महत्त्व द्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी जेईई, नीट आणि युजीसी परीक्षा देशातील 12 भाषांमध्ये देण्याची व्यवस्था केली आहे. भाजपच्या शिवराज सिंह सरकारने देशात प्रथम वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू केल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही शाह पुढे म्हणाले.
अभियांत्रिकीच्या पुस्तकांचेही अनुवाद : चौहान
आज आपल्या राज्यात वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू होत आहे. काही काळाने अभियांत्रिकीचे शिक्षणही हिंदीतून सुरू होईल. आठ भाषांमध्ये अभियांत्रिकीच्या पुस्तकांच्या अनुवादाचे काम देशभरात सुरू झाले आहे. लवकरच देशातील सर्व विद्यार्थी मातृभाषेतून तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षण सुरू करतील. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मध्यप्रदेशच्या भूमीवर वैद्यकीय शिक्षण हिंदीतून होणार आहे. हिंदीच्या अभ्यासामुळे गरीब मुलांच्या जीवनात नवा प्रकाश येईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.
भाषांतरासाठी 97 डॉक्टरांची मदत
स्वातंत्र्यानंतर हिंदीत वैद्यकीय शिक्षण देणारे मध्यप्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. सखोल संशोधन केल्यानंतर आम्ही वैद्यकीय अभ्यास हिंदीत कसा करायचा याचे अध्ययन केले. आता सुरुवातीला तीन पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. यासाठी राज्यातील 97 डॉक्टरांच्या चमूने 4 महिने अहोरात्र मेहनत करून इंग्रजी पुस्तकांचे हिंदीत भाषांतर केले आहे. आम्ही पुढील अभ्यासक्रमांचेही हिंदीमध्ये भाषांतर करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी स्पष्ट केले.
हिंदीतील शिक्षणामुळे क्रांती होईल!
वैद्यकीय-अभियांत्रिकीमध्ये मातृभाषेचे समर्थन करणाऱयांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आम्हाला आमच्याच भाषेत शिक्षण मिळेल. मध्यप्रदेशने वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू करण्याचा संकल्प केल्यामुळे देशात क्रांती होईल.
– अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
15 नोव्हेंबरपासून हिंदीमधून अभ्यासक्रम
समुपदेशनानंतर आलेल्या एमबीबीएसच्या नवीन बॅचच्या विद्यार्थ्यांना हिंदीत अनुवादित पुस्तकांमधून शिकवले जाणार आहे. 15 नोव्हेंबरपासून नवीन बॅचमध्ये हिंदीतून शिक्षण दिले जाणार आहे. या सुविधेमुळे मध्यप्रदेशच्या ग्रामीण भागात राहणाऱया आणि हिंदी माध्यमात शिकणाऱया विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.