भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे कायद्याचे उल्लंघन : करवाईची मागणी, वैद्यकीय कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर


प्रतिनिधी /बेळगाव
वैद्यकीय कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच शहर परिसरात उघडय़ावर वैद्यकीय कचरा आणि हॉस्पिटलचे साहित्य टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे सोमवारी रात्री औषधे, प्रोटीन पावडर, खराब झालेल्या गादय़ा असा वैद्यकीय कचरा उघडय़ावर टाकण्यात आला आहे.
हा प्रकार पाहून या परिसरातील नागरिक चक्रावले असून हा नेमका हॉस्पिटलने टाकलेला कचरा आहे, की आरोग्य खात्यानेच निकामी झालेले साहित्य येथे टाकले आहे, की एखाद्या अंगणवाडीला पुरविलेले हे साहित्य आहे, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
दिवसेंदिवस शहरातील कचऱयाची समस्या बिकट होत चालली असतानाच वैद्यकीय कचऱयाची समस्या अधिक गंभीर होत आहे. अनेक हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांमधून या कचऱयाची वेळेवर उचल होत नसल्याने तो टाकायचा कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचीच परिणीती उघडय़ावर वैद्यकीय कचरा टाकण्यामध्ये होत आहे.
कचरा नेमका कोणी टाकला
वैद्यकीय आणि पर्यावरणीय कायद्यानुसार वैद्यकीय कचरा किंवा कोणत्याही स्वरुपाचे आरोग्याशी संबंधित टाकाऊ साहित्य उघडय़ावर टाकता येत नाही. परंतु कायद्याचे उल्लंघन करत शहर परिसरात कोठेही वैद्यकीय कचरा टाकला जात आहे. हा कचरा नेमका कोणी टाकला आहे, हे गौडबंगाल आहे. मात्र मानव वसती असलेल्या ठिकाणी असा कचरा टाकणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
याबाबत ‘तरुण भारत’ने आरोग्य खात्याचे औषध नियंत्रक रघुराम यांच्याशी संपर्क साधून त्यांना या कचऱयाची छायाचित्रे पाठविल्यानंतर त्यांनी त्वरित आपल्या विभागातील कर्मचाऱयांना पाहणीसाठी पाठविले.
यामध्ये फूड सप्लिमेंट, 100 पाकिटे कॅल्शियम, व्हिटॅमिन गोळय़ांचे 10 बॉक्स याशिवाय अन्य साहित्य टाकण्यात आल्याचे आढळून आले. या कचऱयातून एखादी पावती किंवा पुरावा हाती लागला तर कारवाई करणे शक्मय आहे. परंतु आपण याची कसून चौकशी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अधिकाऱयांनी सर्व साहित्य ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.