वृत्तसंस्था/ रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रोटरडॅम खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव आणि इटलीचा जेनिक सिनेर यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेदव्हेदेवने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 6-1, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. हा सामना 82 मिनिटे चालला होता. मेदव्हेदेवने गेल्या ऑक्टोबरमध्ये व्हिएन्ना टेनिस स्पर्धा जिंकली होती. इटलीच्या 14 व्या मानांकित सिनेरने उपांत्य सामन्यात हॉलंडच्या ग्रिकस्पूरचा 7-5, 7-6(7-5) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. सिनेरने अलीकडच्या कालावधीत एटीपी स्पर्धांमध्ये सलग सातव्यांदा अंतिम फेरी गाठली असून त्याला अद्याप एकदाही मेदव्हेदेवला पराभूत करता आलेले नाही.