वृत्तसंस्था/ ऍडलेड
रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने येथे सुरू असलेल्या ऍडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना मिओमिर केस्मानोविचचा पराभव केला.
माजी अग्रमानांकित असलेला मेदवेदेव्ह सध्या सातव्या क्रमांकावर असून त्याने सर्बियाच्या केस्मानोविचवर सलग तिसऱयांदा विजय मिळविला. मेदवेदेव्हने त्याला 6-0, 6-3 असे सहज नमविले. मेदवेदेव्हला येथे तिसरे मानांकन मिळाले असून त्याची पुढील लढत त्याचाच देशवासी कॅरेन खचानोव्हशी होणार आहे. खचानोव्हने ब्रिटनच्या जॅक ड्रेपरवर 6-4, 6-2 अशी मात करीत आगेकूच केली.
महिला विभागात आर्यना साबालेन्का व मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा यांची उपांत्यपूर्व फेरी गाठ पडणार आहे. दुसऱया मानांकित साबालेन्काने बुधवारी ल्युडमिला सॅम्सोनोव्हावर चुरशीच्या लढतीत 7-6 (10-8), 7-6 (7-3) अशी मात केली तर व्होन्ड्रूसोव्हाने काया कॅनेपीचा 6-0, 6-4 असा धुव्वा उडवित पुढील फेरी गाठली.