वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सिनसिनॅटी खुल्या पुरुष आणि महिलांच्या वेस्टर्न व सदर्न आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात रशियाचा टॉप सिडेड डॅनिल मेदव्हेदेव तसेच ग्रीसचा चौथा मानांकित स्टिफॅनो सित्सिपस, ब्रिटनचा कॅमेरुन नुरी व क्रोएशियाचा कोरिक यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीमध्ये अमेरिकेची मॅडिसन किज तसेच झेकची पेत्रा क्विटोव्हा, बेलारुसची सॅबेलिनेका यांनी शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.
पुरुष एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात 2019 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱया रशियाच्या टॉप सिडेड मेदव्हेदेवने अमेरिकेच्या अकराव्या मानांकित फ्रिझचे आव्हान 7-6(7-1), 6-3 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. दुसऱया एका उपांत्यपूर्व लढतीत ग्रीसच्या सित्सिपसने अमेरिकेच्या इस्नेरवर 7-6(7-5), 5-7, 6-3 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.
मेदव्हेदेव आणि सित्सिपस यांनी अमेरिकेच्या टेनिसपटूंचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आणले. मेदव्हेदेवने उपांत्यपूर्व सामन्यात 18 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. ब्रिटनच्या टॉप सिडेड कॅमेरुन नुरीने स्पेनच्या कार्लोस ऍल्कॅरेझचा 7-6(7-4), 6-7(4-7), 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. क्रोएशियाच्या कोरिकने कॅनडाच्या ऍलीसिमेचा 6-4, 6-4 असा फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. कोरिक आणि नुरी तसेच मेदव्हेदेव व सित्सिपस यांच्यात उपांत्य लढती होतील.
महिलाच्या विभागात अमेरिकेच्या मॅडिसन किझने विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेत्या इलिना रिबेकिनाचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मॅडिसन किझ आणि झेक प्रजासत्ताकची क्विटोव्हा यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. झेकच्या क्विटोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या ऍजेलाचा 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सच्या गार्सियाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलावर 6-1, 7-5 अशी मात करत पुढील फेरी गाठली. सबालेंकाने चीनच्या झेंग शुईवर 6-4, 7-6(7-1) अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. गार्सिया आणि सॅबेलिनेका यांच्यात उपांत्य लढत होणार आहे.