वसंतराव मुळीक यांची माहिती : शाहूप्रेमींसह माजी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
मेन राजाराम शाळेचे अस्तित्व टिकविण्यासाठी आज मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. मेन राजाराम हायस्कूलबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा करणे अपेक्षित असताना एकतर्फी निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही शाळा वाचविण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी शाहूप्रेमी नागरिकांसह या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.
मेन राजाराम हायस्कूलची इमारत 1870 साली छत्रपती राजाराम महाराज यांनी फिशाळेसाठी बांधली होती. राजर्षी शाहू महाराजांचे देखील या शाळेतील शैक्षणिक कार्यावर विशेष लक्ष होते. आजही या हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजमध्ये 771 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजाराम महाराज, शाहू महाराज यांच्या स्मृती या शाळेशी जोडल्या गेल्या असूनही येथून ही शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेवून सर्वागिंण चर्चा करणे अपेक्षित असताना एकतर्फी शाळा हलविण्याचा निर्णय शाहूप्रेमी कदापी मान्य करणार नाहीत, तरी याविषयी पुढील निर्णय आजच्या बैठकीचे आयोजन केले आहे, असे मुळीक यांनी सांगितले.