कमानीच्या फलकावरील कन्नड अक्षरांच्या आकाराबाबत चर्चा : ग्रामस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार
वार्ताहर /उचगाव
कन्नड प्राधिकरण अध्यक्ष टी. एम. नागाभरण यांनी सोमवारी बेळगाव येथे बैठक घेऊन बेळगाव शहर व जिह्यामध्ये असलेले मराठी फलक व कमानीवरील मजकूर कन्नडमध्ये लिहावा, असे सांगितले. त्यामुळे मंगळवारी उचगाव ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीला डीसीपी रवींद्र गडाद, एसीपी गणपती गुडाजी, जिल्हा उपनिर्देशक बसवराज, तालुका पंचायतचे राजेंद्र धनवाडकर, सीपीआय गुरुनाथ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी उचगाव ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी वासुदत्त यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र गडाद यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी बेळगाव-वेंगुर्ला रोडवर उचगाव फाटय़ावर उभारण्यात आलेल्या कमानीमध्ये प्रोटोकॉलप्रमाणे 40 व 60 टक्के अक्षरे लिहिलेली नाहीत. त्यामध्ये 60 टक्के कन्नड अक्षर तर 40 टक्के मराठी अक्षरे हवीत. यावरून अनेकवेळा ग्राम पंचायतीला कळविले होते. परंतु त्याची कार्यवाही झाली नव्हती. कन्नड प्राधिकरण अध्यक्ष टी. एस. नागाभरण यांच्या सुचनेनुसार लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात आले.
युवक मंडळांची उद्या बैठक
उचगाव येथील नागरिकांची व युवक मंडळांची बैठक गुरुवार दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता मध्यवर्ती गणेश-विठ्ठल मंदिर येथे बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरविण्यात येणार आहे. या स्वागत कमानीमधील कन्नड अक्षरे बदलताना मराठी अक्षरे आहेत त्याचप्रमाणे ठेवण्यात येणार आहेत. फक्त कन्नड अक्षरे आकाराने थोडी मोठी करण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले. गावातील सर्व नागरिकांना व युवक मंडळांना विश्वासात घेऊनच हे काम करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे
उचगावमध्ये पूर्वीपासूनच सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना क्षुल्लक गोष्टीमुळे वाद निर्माण होऊ नयेत यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. हा संपूर्ण भाग मराठी असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे यावेळी सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले. या बैठकीला ग्राम पंचायत सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, बंटी पावशे, मोनाप्पा पाटील, गजानन नाईक, सूरज सुतार, स्मिता खांडेकर, योगिता देसाई, रुपा गोंधळी, अनुसया कोलकार, भारती जाधव, माधुरी पाटील, नागरत्न कोरडे, पंचायतीच्या सेपेटरी सुमेरा मोकाशी व कर्मचारी उपस्थित होते.