प्रतिनिधी/कोल्हापूर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारिणीची बैठक येत्या बुधवारी 22 जून रोजी येथील हॉटेल केट्री येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. बैठक घेण्यासंदर्भात कार्यवाह अशिष शेलार यांनी संचालक मंडळाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या बैठकीत नक्की काय होणार? याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कार्यकाल संपून दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही अध्यक्षांकडून कार्यकारणीची बैठक आयोजित केली जात नसल्याचा आरोप होत होता. बैठक आयोजनाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. अक्षरशः चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचे प्रकार घडले. तरीही अध्यक्षांनी दखल घेतली नसल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आता संचालकांच्या वारंवार मागणीनुसार ही बैठक आयोजित केली आहे. वादाच्या भोवऱयात सापडलेल्या चित्रपट महामंडळाच्या बैठकीत काय होणार? अशी चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे.