Tarun Bharat

दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी बैठक

वृत्तसंस्था, प्रतिनिधी/ नवी दिल्ली, कोल्हापूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बुधवारी, 14 डिसेंबर रोजी एकत्र बोलावून समन्वयातून मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. सीमावादाच्या मुद्दय़ावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांनी खासदारांचे म्हणणे ऐकून घेतले. उपस्थित मुद्यांवर गुजरातमधील शपथविधी झाल्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

गुजरात शपथविधीनंतर केंद्रीय मंत्री शहा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्नाटक सीमा वादाबाबत बोलणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या दरबारात कर्नाटक सीमा वादावर गुजरात शपथविधीनंतरच तोडगा निघू शकेल, हे स्पष्ट झाले आहे. या भेटीत महाविकास आघाडीच्या खासदारांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत असलेली नाराजी मंत्री शहा यांच्याकडे बोलून दाखवली. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सामंत, डॉ. अमोल कोल्हे, राजन विचारे, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चर्तुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, सुरेश धानोरकर, मोहम्मद फैजल यांचा समावेश होता.

समन्वयाने तोडगा काढावा ः डॉ. अमोल कोल्हे

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवरून बोलणे झाले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला. ते 14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.

शहा नक्कीच मार्ग काढतील ः सुप्रिया सुळे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटीसाठी वेळ दिल्याने त्यांचे आभार मानते. आम्ही राज्यातील अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन त्यांनी यातून मार्ग काढण्याची विनंती केल्याचे सुळे यांनी सांगितले. अमित शहा यांनी शब्द दिला आहे, गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सीमावादावर काहीतरी मार्ग काढला जाईल. त्यामुळे सीमावादात आता केंद्र सरकारचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आमची राज्यातील सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची बेताल वक्तव्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबतची अवमानकारक वक्तव्ये, शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची माहिती गृहमंत्र्यांना आम्ही दिली आहे. तसेच छत्रपतींचा अवमान करणाऱयांची राज्य सरकारकडून कशी पाठराखण केली जात आहे, हेदेखील गृहमंत्र्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले आहे. गुजरात शपथविधीनंतर केंद्रीय मंत्री शहा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्नाटक सीमावादाबाबत बोलणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या दरबारात कर्नाटक सीमावादावर गुजरात शपथविधीनंतरच तोडगा निघू शकेल, हे स्पष्ट झाले असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेर

सुप्रिया सुळे यांनी आजच्या बैठकीमध्ये शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ठाकरे गटाच्या खासदारांकडून जोरदार विरोध झाला. ठाकरे गटाकडून विरोध होत असल्याने अखेर धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना अमित शहा यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले.

भाजप खासदारांची थेट पंतप्रधानांशी चर्चा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, प्रकाश जावडेकर या भाजप खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. छत्रपती शिवरायांचा सातत्याने होत असलेल्या अवमानाचा मुद्दा आणि राज्यपालांविषयीची नाराजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. तर खासदार डॉ. बोंडे, धनंजय महाडिक यांनी सीमावादावर पंतप्रधानांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात स्वतः लक्ष घातल्याची माहिती आहे.

सीमाभागातील मराठी माणूस दहशतीखाली

खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत मांडली व्यथा,

कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे सीमाभागातील मराठी भाषिक दहशतीखाली आहे. येथील वातावरण भयमुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी सीमाप्रश्नविषयक तज्ञ समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी संसदेत केली.

खासदार धैर्यशील माने यांनी सीमाभागात सुरू असलेल्या अन्यायाला लोकसभेच्या कामकाजात वाचा फोडली. ते म्हणाले, सीमाभागात कर्नाटक सरकारपुरस्कृत दहशत सुरू आहे. येथील जनता भीतीच्या छायेखाली आहे. एका बाजूला सीमाप्रश्नी समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू असताना असे प्रकार थांबवणे आवश्यक आहे. दोन्ही राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे. येथील मराठी माणसाला दिलासा देणे आवश्यक असून केंद्र सरकारनेच दोन्ही राज्यांत समन्वय साधून वातावरण अधिक बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.  

Related Stories

ईडी कार्यालयात ‘कोरोना’चा प्रवेश

Patil_p

देशात 2026 मध्ये धावणार बुलेट ट्रेन

Patil_p

देशात 14.77 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी

Patil_p

मेकअपचे वेड असणारा श्वान

Patil_p

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये गोळीबार, 10 जखमी

Patil_p