– दरदिवशी सात ते आठ बैठकांमध्ये अधिकारी व्यस्त
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू मैदानावर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षेची व स्वागताची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व कामे दूर ठेवून सध्या पंतप्रधानांचा हा कार्यक्रम सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्रम पत्रिकेवर अग्रस्थानी असल्याने पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी स्वत: यात लक्ष घालून सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवली आहे.
पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयात सध्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. दरदिवशी सरासरी सात ते आठ बैठका होत असल्याने या बैठकांमधून महासंचालक सिंग हे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेविषयीचा आढावा घेत आहेत. अनेक पोलिस स्थानकांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकांना उपस्थित रहावे लागत असल्याने सध्या त्यांच्यावर कमालीचा ताण आला आहे.
पोलिसांना सुट्टी नाही
पोलीस कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा यंत्रणेसाठी दक्ष राहण्याचे आदेश दिल्याने त्यांचीही धावपळ सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे 26 रोजी जरी पाच ते सहा तासांसाठी राज्यात उपलब्ध असले तरी त्यांच्या सुरक्षाविषयक तयारीची चाचणी प्रत्येक दिवसागणिक घेतली जात आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपुष्टात येईपर्यंत पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी सुट्टीवर जाऊ नये, असे आदेश पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.
रोज प्रात्यक्षिकांवरही जोर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. प्रत्येक दिवशी सुरक्षाविषयक तयारीची चाचणी घेण्याबरोबरच प्रात्यक्षिकेही केली जात आहेत. या सर्व माहितीबाबत स्वत: पोलीस महासंचालक पाठपुरावा करीत असल्याने प्रात्यक्षिकांद्वारे सुरक्षा विषयक तयारीची चाचणी घेतली जात आहे.