12 वर्षे जुना उपग्रह ः अद्याप 125 किलोग्रॅम इंधन शिल्लक
वृत्तसंस्था / बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) एका अत्यंत आव्हानात्मक प्रायोगिक मोहिमेच्या अंतर्गत 7 मार्च रोजी स्वतःचा कार्यकाळ पूर्ण केलेला हवामान विषयक उपग्रह मेघा ट्रॉपिक्सला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या कक्षेत प्रवश करविणार आहे. इस्रोकडून अखेरीस हा उपग्रह प्रशांत महासागरात एका निर्जनस्थळी पाडविला जाणार आहे.
भारत-फ्रान्सच्या संयुक्त भागीदारीत हवामानाच्या अध्ययनासाठी तयार करण्यात आलेला मेघा ट्रॉपिक्स उपग्रहाचे प्रक्षेपण 12 ऑक्टोबर 2011 रोजी करण्यात आले होते. हा उपग्रह तीन वर्षांच्या मोहिमेवर प्रक्षेपित करण्यात आला होता, परंतु उपग्रहाने एक दशकापर्यंत सेवा बजावली आणि क्षेत्रीय तसेच जागतिक हवामानाच्या अध्ययनासाठी मौल्यवान आकडेवारी प्रदान केली होती.
मेघा ट्रॉपिक्स उपग्रहाला आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतराळ अवशेष समन्वय समितीच्या दिशानिर्देशांनुसार पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेतून हटविले जाणार आहे. सुमारे 1 हजार किलोग्रॅम वजनी मेघा ट्रॉपिक्स 867 किलोमीटर उंचीवरील कक्षेत आहे. तसेच उपग्रहात अद्याप सुमारे 125 किलोग्रॅम इंधन शिल्लक आहे.
उपग्रह आहे त्याच कक्षेत सोडण्यात आल्यास तो 100 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा घालतर राहिल, परंतु त्यात मोठय़ा प्रमाणात इंधन शिल्लक असल्याने तो तुटण्याचा आणि जोखीम निर्माण करण्याचा धोका मोठा आहे. याचमुळे प्रशांत महासागारत एका निर्जनस्थळी तो पाडविण्याची योजना आखण्यात आली आहे. याकरता उपग्रहात शिल्लक असलेल्या इंधनाचा वापर करत तो नियंत्रित पद्धतीने वातावरणात पुन्हा आणला जाणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.