73 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची कारवाई ः एकाही अधिवेशनात घेतला नव्हता भाग
वृत्तसंस्था / टोकियो
जपानच्या संसदेने आमराय येथील एका खासदाराचे सदस्यत्व संपुष्टात आणले आहे. देशाच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच गैरहजर राहणाऱया कुठल्याही संसद सदस्याच्या विरोधात अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी खराब वर्तनामुळे एका खासदाराला स्वतःचे सदस्यत्व गमवावे लागले होते.
गैरहजर राहिल्याने सदस्यत्व गमवावे लागलेल्या खासदाराचे नाव योशिकाजू हिगाशितानी आहे. 51 वर्षीय योशिकाजू हे प्रोफेशनल युटय़ूबर असून एका गॉसिप शोचे सूत्रसंचालन करतात. योशिकाजू हे स्वतःचा पूर्ण वेळ स्वतःच्या युटय़ूब चॅनेलला देत होते. याचमुळे संसदेच्या कुठल्याही अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता. योशिकाजू यांच्या विरोधात याचमुळे पक्ष तसेच संसदेला कारवाई करावी लागली आहे.
योशिकाजू जपानमधील मोठी सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या गॉसिप चॅनेलवरील कार्यक्रमात अनेक वलयांकित व्यक्ती सामील होत असतात. 51 वर्षीय योशिकाजू हे 7 महिन्यांपूर्वीच खासदार झाले होते. जनतेसाठी काम करण्याऐवजी पूर्ण वेळ युटय़ूब चॅनेलला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. योशिकाजू यांच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला होता. खासदार किंवा मंत्री झाल्यास संबंधितांना स्वतःच्या कामावरच लक्ष केंद्रीत करावे लागेल असा संदेश राजकारण्यांना तसेच सर्वसामान्य लोकांना देण्याकरता योशिकाजू यांचे सदस्यत्व संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष समितीचा निर्णय
योशिकाजू यांचे सदस्यत्व संपुष्टात आणण्याचा निर्णय संसदेच्या एका विशेष समितीने घेतला आहे. तत्पूर्वी योशिकाजू यांचा पक्ष आणि इतर खासदारांचे मत जाणून घेण्यात आले. यानंतर संसदेत एक प्रस्ताव सादर करण्यात आला जो संमत झाला. आमच्या देशात लोकशाही असून खासदार निवडण्यासाठी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची तुम्ही थट्टा केल्यास कारवाई होणारच. योशिकाजू यांनी लोकशाहीचे महत्त्व ओळखले नसल्याचे शिस्तपालन समितीचे प्रमुख मुनेओ सुझुकी यांनी म्हटले आहे. योशिकाजू हे जुलै महिन्यात खासदार म्हणून निवडून आले हेते. सेईजिका पक्षाच्या वतीने ते निवडून आले होते. हा पक्ष शासकीय प्रसारमाध्यमांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची मागणी करतो. या पक्षाचे केवळ दोनच खासदार आहेत. योशिकाजू यांच्याव्यतिरिक्त दुसरा खासदार संसदेच्या अधिवेशनात पूर्णवेळ सहभागी होत असतो.
आता अटकेची भीती
योशिकाजू हे बराच काळ दुबईत वास्तव्यास असतात. जपानमध्ये परतलो तर मला अटक करण्यात येईल अशी भीती आहे. जपानमध्ये परतल्यावर संसदेच्या अपमानाबद्दल माझी चौकशी होईल असे बोलले जात असल्याचे योशिकाजू यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.