वृत्तसंस्था /राजकोट
आयसीसी इलाईट पंच पॅनेलमध्ये भारताच्या नितीन मेनन यांनी आपले स्थान कायम राखले आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱया लंकेत मेनन प्रथमच त्रयस्थ पंचाची काम पाहणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) भारताच्या नितीन मेनन यांना एक वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. आयसीसीच्या 11 जणांच्या इलाईट पंच पॅनेलमध्ये इंदोरचे 38 वर्षीय नितीन मेनन हे एकमेव भारतीय पंच आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत नितीन मेनन हे भारताचे आघाडीचे क्रिकेट पंच म्हणून ओळखले जातात. आता पुढील महिन्यात लंकेत होणाऱया मालिकेत मेनन त्रयस्थ पंचाचे काम पाहणार आहेत. यापूर्वी या इलाईट पंच पॅनेलमध्ये भारताच्या एस. वेंकटराघवन आणि एस रवी यांचा समावेश होता. नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ भारतात मर्यादित स्वरूपात पंचगिरी केली आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफेल हे पंचगिरी करत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत नितीन मेनन आपली सेवा बजावत असून या मालिकेनंतर ते लंकेला प्रयाण करणार आहेत. लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 29 जूनपासून गॅले येथे सुरू होणार आहे.
आयसीसी इलाईट पंच पॅनेलमध्ये पाकचे अलिम दार, न्यूझीलंडचे ख्रिस गॅफेनी, लंकेचे कुमार धर्मसेना, दक्षिण आफ्रिकेचे एम. इरासमुस, इंग्लंडचे मायकेल गॉ, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफल आणि रॉड टकर आणि विंडीजचे जोएल विल्सन, भारताचे नितीन मेनन यांचा समावेश आहे.