नवी दिल्ली
जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान भारतात 28 टक्क्यांच्या वाढीसह 11,469 कार्सची विक्री केली आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने गेल्या वर्षी याच कालावधीत 8,958 कार्स विकल्या असून कंपनीने चांगली प्रगती साधली आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन श्वेंक म्हणाले, ‘आमची विक्री कोविड-19 महामारीपूर्वीच्या पातळीवर आहे. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतील विक्रीने 2021 च्या विक्रीच्या संख्येला मागे टाकले आहे. बाजाराची सध्याची गती आम्हाला आतापर्यंतची सर्वोच्च विक्री गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास देते.’
मर्सिडीज-बेंझ इंडियाने 2021 मध्ये एकूण 11,242 युनिट्स विकल्या. पुरवठा कमी असूनही आतापर्यंत विक्रीत चांगली वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. उत्सवी वातावरणाचा लाभ कंपनीला होत असून मागणीही बऱयापैकी राहिली आहे. येत्या काळातही विक्री वाढीचा सिलसिला चालूच राहिल असा विश्वास कंपनीला आहे.