भाजप नेते सुशील कुमारांचा दावा ः नितीश यांचे अनेक आमदार संपर्कात
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संजदमध्ये पळापळ सुरू झाली असून त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. तसेच संजदचे लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या राजदमध्ये विलीनीकरण होणार असल्याचा दावा मोदींनी केला आहे. मोकामा आणि गोपालगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी सुशील मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे.
संजदचे अनेक आमदार हे नितीश कुमार यांच्या महाआघाडीत सामील होण्याच्या निर्णयामुळे नाराज आहेत. पुढील निवडणुकीत या आमदारांचे तिकीट कापून राजद नेत्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. याचमुळे हे आमदार आता भाजपच्या वाटेवर आहेत. संजदचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. भाजप यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
संजदचे राजदमधील विलिनीकरण लवकरच होणार हे निश्चित आहे. नितीश कुमार यांना पक्षात फूट पडण्याची भीती आहे. राजदने मोकामा आणि गोपालगंज येथे कलंकित नेत्यांना उमेदवारी दिल्याने नितीश कुमार हे प्रचारात सामील होणे टाळत आहेत. प्रकृतीचा दाखला देत त्यांनी प्रचारात सामील होणे टाळले आहे, परंतु दुसऱया कार्यक्रमांमध्ये सामील होत असल्याचे म्हणत सुशील कुमार मोदींनी नितीश कुमारांना लक्ष्य केले आहे.