Tarun Bharat

म. ए. समितीचा 5 मेपासून तालुक्यात जागृती दौरा

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीवर शिक्कामोर्तब व बळकटीसाठी गुरुवार दि. 5 मे पासून शिवस्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करून तालुक्यात जागृतीसाठी विभागवार दौरे करण्याचे ठरविण्यात आले आहे. संपूर्ण तालुक्याच्या दौऱयानंतर जाहीर बैठक घेऊन समितीची एकसंघ कार्यकारिणी निवडण्यात येईल, असे रविवारी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

खानापूर तालुका म. ए. समितीची एकी झाल्यानंतर मराठी भाषिकांत जागृती निर्माण करण्यासाठी दि. 4 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही गटांच्या 16 जणांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. या निर्णय कमिटीची बैठक रविवारी शिवस्मारक येथे पार पडली. या बैठकीत तालुक्यात मराठी भाषिकांत समितीच्या एकीसंदर्भात तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कार्यक्रम ठरविण्यासाठी संपूर्ण तालुक्यात दौरा करण्याचे ठरविण्यात आले. गुरुवार दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यात येणार आहे.

निर्धार सभांचे नियोजन

तालुक्यात समितीच्या बळकटीसाठी व मराठी भाषिकांत जागृती निर्माण करण्यासाठी गावोगावी सभा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. याची सुरुवात म्हणून गुरुवार दि. 5 रोजी सायंकाळी 7 वाजता कुप्पटगिरी येथे हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांना अभिवादन करून पहिली निर्धार सभा घेण्याचे ठरविले. अनामत रक्कम संदर्भात न्यायालयीन दावा मागे घेण्याचे जाहीर करण्यात आले. याबाबत रुक्माण्णा झुंजवाडकर, आबासाहेब दळवी यांनी दावा मागे घेत याबाबत सोपस्कार पूर्ण केल्याचे सांगितले. काही बाबी पूर्ण करण्यासाठी निरंजन देसाई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, सूर्याजी पाटील, गोपाळ पाटील, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे, जयराम देसाई, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी, सुरेश देसाई, धनंजय पाटील, निरंजन देसाई, राजाराम पाटील, बळीराम पाटील या 16 जणांच्या निर्णय कमिटीने बैठकीत वरील निर्णय घेतला.

Related Stories

किणये-कर्ले भागातील शेती गवी रेडय़ांमुळे अडचणीत

Amit Kulkarni

डान्स स्कूल चालकांनाही पॅकेज द्या

Patil_p

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सहकार्य करा

Amit Kulkarni

चार वर्षांच्या नरकयातनांतून तरुणीची सुटका

Amit Kulkarni

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने कणबर्गीत भीती

Amit Kulkarni

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!