Tarun Bharat

मेट्रो-रेल्वे प्रगतीपथावर…

Advertisements

विकसनशील देश अशी ओळख असलेला भारत आता विविध क्षेत्रांमध्ये आघाडी घेत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच अनेक सकारात्मक बाबींमुळे भारताचा नावलौकिक वाढताना दिसत आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात भारताने कोरोना या महाभयंकर सांसर्गिक आजाराशी दिलेली लढत जागतिक पातळीवर दखलपात्र ठरली. संशोधन, नवतंत्रज्ञान, सुरक्षा यंत्रणा, अर्थव्यवस्था, कृषिसंपन्नता, आरोग्य अशा सर्वच पातळीवर भारताने आपली चमक दाखवली आहे. वाढती लोकसंख्या आणि विविध समस्यांचा सामना करत सुरू असलेली ही वाटचाल निश्चितच स्वागतार्ह आहे. आता भारत अंतर्गत व्यवस्था भक्कम करण्यावर भर देत असून त्याला विविध विभागांकडून बळ मिळत आहे. गेल्या काही वर्षात देशात आपल्या सरकारकडून चांगले मेट्रो प्रकल्प राबविले गेल्यामुळे विकासालाही गती मिळाली आहे. येत्या काही वर्षांत त्याचे स्पष्ट परिणाम दिसून येतील. याबरोबरच वाहतुकीच्या अन्य समस्या सोडवण्यासाठी आपले भारतीय शास्त्रज्ञ अहोरात्र कष्ट करत आहेत. वाढत्या लोकसंख्येला सुविधा प्रदान करण्यासाठी मेट्रो रेल्वेचे योगदान खूप मोठे आहे. विविध मेट्रो शहरांमध्ये प्रकल्प उभारण्याबरोबरच अधिक गर्दीची उपशहरेही मेट्रोरेल्वेने जोडण्याचा सरकारचा विचार आहे. वेगाने वाढणारी ही सेवा वाढत्या लोकसंख्येसाठी लाभदायी असून अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी ठरणार आहे.

मेट्रो रेल्वे ही एक अशी वाहतूक व्यवस्था आहे जिच्या मदतीने एकावेळी अनेक लोक सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाऊ शकतात. देशाच्या प्रगतीत वाहतूक सुविधेचा मोठा वाटा आहे. या स्थितीत मेट्रो रेल्वेची सुविधा मोठी भूमिका बजावू शकते. आपल्या देशातील शहरांची लोकसंख्या ज्या प्रकारे दिवसेंदिवस वाढत आहे, त्याप्रमाणे त्यांच्या गरजाही वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत चांगले प्रकल्पच देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतात. मेट्रो रेल्वे एक अतिशय सोयीचे, जलद, कार्यक्षम आणि विश्वासार्ह माध्यम आहे. मेट्रो रेल्वे विजेवर चालत असल्याने ती पर्यावरणपूरकही आहे. साहजिकच पर्यावरणाचे प्रदूषण सुद्धा होत नाही. या रेल्वेमध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक वेगवेगळय़ा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मेट्रो रेल्वेमध्ये इतर कोणत्याही वाहनाच्या प्रवास खर्चापेक्षा कमी शुल्क आकारले जाते. प्रवाशांना कमी वेळात त्यांच्या निर्धारित ठिकाणी पोहोचवत असल्यामुळे ही सेवा अतिशय स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाते.

देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून मोठय़ा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यावर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी भर दिला असला तरी गेल्या काही वर्षांत सुरू झालेले सर्वच मेट्रो प्रकल्प हे आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहेत. प्रकल्प अहवाल तयार करताना अपेक्षित धरण्यात आलेली प्रवासी संख्या आणि प्रत्यक्ष प्रवासी यात मोठी तफावत असली तरी पूर्ण क्षमतेने प्रतिसाद मिळू लागल्यास या सेवेला लवकरच सुगीचे दिवस येऊ शकतात. नोएडा मेट्रो रेल्वेच्या बाबतीत वाढत असलेली प्रवासीसंख्या ही याचाच शुभसंकेत मानायला हरकत नाही.

2006 मध्ये राजधानी दिल्लीत मेट्रो प्रत्यक्ष सुरू झाली आणि मेट्रोने आतापर्यंत सुमारे 400 किमीचे जाळे विणले आहे. 2011 पासून आतापर्यंत मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊनही दिल्लीतील मेट्रो प्रकल्प कार्यात्मकदृष्टय़ा फायद्यात असला तरी सुरुवातीला हा प्रकल्प काहीसा तोटय़ात होता. मुंबईत 2014 मध्ये घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा हा पहिला मेट्रो मार्ग सुरू झाला. प्रवासी संख्येत वाढ झाली तरी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या वतीने चालविण्यात येणारा हा प्रकल्प अजूनही अपेक्षित आर्थिक ध्येय गाठताना दिसत नाही. बेंगळूर, कोची, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता मेट्रोचे चित्र फारसे वेगळे नाही. कोरोना लॉकडाऊन काळातील कमी प्रवासीसंख्या हे कारण पुढे करण्यात येत असले तरी गेल्या वर्षभरात सर्वच शहरांमधील प्रवासीसंख्या सातत्याने वाढताना दिसत असल्यामुळे लवकरच अपेक्षित आर्थिक मोबदला मिळविण्यात हे प्रकल्प सफल होतील अशी आशा आहे.

नोएडा मेट्रो रेल्वेने केला विक्रम

एका दिवसात 40 हजारांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

सतत तोटय़ाचा सामना करत असलेल्या नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नुकताच विक्रम केला आहे. एका दिवसात जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करण्याचा हा विक्रम आहे. मात्र, स्थापनेनंतर नोएडा मेट्रोने हा विक्रम दुसऱयांदा केला आहे. यावेळी नोएडा मेट्रोने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. जानेवारी 2019 मध्ये नोएडा मेट्रो सुरू झाल्यापासून, मेट्रोने दुसऱयांदा प्रवास करणाऱया सर्वाधिक प्रवाशांचा विक्रम मोडला आहे. 8 ऑगस्ट रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 40 हजार 295 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यापूर्वी 19 सप्टेंबर 2019 रोजी 39,451 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करून विक्रम केला होता. प्रवासीसंख्येच्या बाबतीत नवा विक्रम करणे हे मेट्रोरेल्वेसाठी चांगले लक्षण मानले जात आहे.

प्रवासीसंख्येचा चढता आलेख

नजिकच्या काळात नोएडा मेट्रोशी अनेक नवीन योजना जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे नोएडातील प्रवाशांची संख्या आणखी वाढू शकते. 2019 मध्ये नोएडा मेट्रोला प्रारंभ झाला होता. मात्र त्यानंतर दुसऱयाच वर्षी म्हणजे 2020 आणि 2021 मध्ये कोरोना-लॉकडाऊनमुळे नोएडा मेट्रोला मोठा फटका बसला होता. पण नोएडातील प्रवाशांची सरासरी संख्याही वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. यावषी एप्रिलमध्ये 26 हजार 162, मे महिन्यात 29 हजार 089, जूनमध्ये 30 हजार 366 आणि जुलैमध्ये 32 हजार 202 अशापद्धतीने प्रवासीसंख्या वाढताना दिसत आहे.

दिल्ली-नोएडा मेट्रो रेल्वे फूट ओव्हरब्रिजने जोडणार

मेट्रोच्या प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी दिल्ली आणि नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने संयुक्तपणे एक मोठे पाऊल उचलले आहे. नोएडामधील दोन मेट्रो स्थानकांदरम्यान फूट ओव्हरब्रिजची सुविधा दिली जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना एका स्थानकावरून दुसऱया मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी रस्तामार्गाचा वापर करावा लागणार नाही. येत्या एका वर्षात नोएडा मेट्रोचे सेक्टर 51 आणि दिल्ली मेट्रोचे सेक्टर 52 मेट्रो स्टेशन फूट ओव्हरब्रिजच्या मदतीने जोडले जातील. हा फूट ओव्हरब्रिज बांधण्याचे काम नोएडा प्राधिकरण करणार आहे. एक्वा मेट्रो लाईनच्या सेक्टर-142 स्टेशनला ब्लू आणि मॅजेंटा लाईन्सच्या बोटॅनिकल गार्डन स्टेशनशी जोडणारा कॉरिडॉर तयार करण्याची योजना सुरू आहे. योजनेबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे.

दिल्ली-नोएडा विमानतळे मेट्रोने जोडण्याची योजना

120 किमी प्रतितास वेगाने सुपरफास्ट मेट्रो टेन चालवण्याची यमुना प्राधिकरणाची योजना आहे. जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मेट्रो टेनही जेवरपर्यंत पोहोचवण्यासाठी पहिल्या टप्प्यात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नॉलेज पार्क (ग्रेटर नोएडा) या 38 किमी लांबीच्या मार्गापर्यंत नवीन मेट्रो रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या संपूर्ण लाईन नव्या पद्धतीने टाकण्यात येणार आहेत. दुसरा टप्पा 35.6 किमीचा असून या टप्प्यात नॉलेज पार्क ते जेवर विमानतळापर्यंत मेट्रो टेन चालवण्याची योजना आहे.

पहिल्या जलद रेल्वेचे काम युद्धपातळीवर

‘एनसीआरटीसी’कडून प्राथमिक चाचणीचा व्हिडीओ जारी

मार्च 2023 पासून देशात जलद रेल्वे धावण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे. सर्वप्रथम गाझियाबादमध्ये पहिली जलद रेल्वे धावणार आहे. त्यानंतर दिल्ली ते मेरठचा प्रवास अवघ्या 50 मिनिटांत पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. गाझियाबादमध्ये रॅपिड (जलद) रेल्वेचे काम सध्या जोरात सुरू आहे. दुहाई डेपोत तयार करण्यात आलेल्या 500 मीटर लांबीच्या ट्रकवर नुकतीच रॅपिड रेल्वे धावताना दिसली. रॅपिड रेल्वे विजेवर चालवून त्याची चाचणी घेतली जात आहे.  ‘एनसीआरटीसी’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर 51-सेकंदाचा व्हिडीओ अपलोड केला असून त्यात दुहाई डेपोच्या ट्रकवर जलद रेल्वे धावताना दिसत आहे. ही प्री-ट्रायल मेडेन-रन आहे. पहिली जलद रेल्वे दुहाई डेपोमध्ये आली असून, रुळावरून उतरवून तिची चाचणी घेतली जात आहे. चाचणीचे काम पूर्ण होताच आणि कॉरिडॉर तयार होताच, रॅपिड रेल्वेची चाचणी कॉरिडॉरवर घेतली जाईल. रॅपिड रेल्वेची मुख्य चाचणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये रॅपिड रेल्वेची चाचणी होण्याची शक्मयता आहे.

दिल्ली ते मेरठ दरम्यान जलद रेल्वेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर बोगदा बांधण्याची कामेही रात्रंदिवस सुरू आहेत. मेरठमधील ब्रह्मपुरी स्टेशनच्या पलीकडे एक भूमिगत ट्रक तयार केला जात आहे. मेरठमध्ये जलद रेल्वेच्या ट्रकवर मेट्रोही चालवली जाणार आहे. वीजतारा आणि उपकरणे बसवल्यानंतर हा मार्ग सप्टेंबरपर्यंत चाचणीसाठी सज्ज होईल. दुहाई डेपो स्टेशनचा सर्वाधिक लाभ आजूबाजूच्या 18 गावांतील लोकांना मिळणार आहे.

प्रमुख चार स्थानकांचे 75 टक्के काम पूर्ण

रॅपिड रेल्वेच्या प्राधान्य विभागातील प्रमुख चार स्थानके आता दृश्यमान आहेत. स्थानकांचे सुमारे 75 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गुलधर, साहिबाबाद नंतर सप्टेंबरच्या अखेरीस होणारी ट्रायल रन पाहता मेरठ रोड तिराहा स्टेशनवर प्लॅटफॉर्म बनविण्याचे काम सुरू झाले आहे. साहिबाबाद आणि गुलधर स्थानकाचे 95 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या प्लॅटफॉर्म शेड आणि फिनिशिंगचे काम सुरू झाले आहे.

देशातील मेट्रो रेल्वे प्रारंभ….

कोलकाता        24 ऑक्टो. 1984

दिल्ली                        24 डिसेंबर 2002

बेंगळूर                        20 ऑक्टो. 2011

मुंबई              8 जून 2014

जयपूर                        3 जून 2015

चेन्नई              29 जून 2015

उल्लेखनीय नोंदी…

सर्वात जुना (पहिला) प्रकल्प ः कोलकाता मेट्रो

देशातील नवीनतम मेट्रो रेल्वे प्रकल्प ः पुणे मेट्रो

सर्वात मोठा मेट्रो प्रकल्प ः दिल्ली (347 किमी)

सर्वात लहान मेट्रो प्रकल्प ः अहमदाबाद (6 किमी)

सर्वाधिक प्रवासीसंख्येचा मेट्रो रेल्वे प्रकल्प ः दिल्ली

Related Stories

‘ऑलिव्ह रिडले’ कासवांची समुद्राकडे धाव

datta jadhav

साहित्यीक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यीक भारत सासणे

Rohan_P

सार्थक सेवा संघातील निराधार मुलांना मदत

Rohan_P

खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना ‘युवक क्रांतीवीर’ पुरस्कार जाहीर

prashant_c

कलाकार त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो : पंडित अतुलकुमार उपाध्ये

Rohan_P

नोएडा प्राधिकरणने सुरू केली ‘ऑक्सिजन बँक’

Rohan_P
error: Content is protected !!