भूकंपबळींच्या स्मरणार्थ रस्त्यावर उतरली जनता ः तेव्हाच 7.6 तीव्रतेचा भूकंप ः एकाचा मृत्यू
वृत्तसंस्था / मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱयानजीक सोमवार म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. दुपारी एक वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11.30 वाजता) बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी नोंदविली गेली. भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी लोक रस्त्यांवर उतरून 1985 आणि 2017 मध्ये झालेल्या दोन भीषण भूकंपातील बळींचे स्मरण करत होते. भूकंपाचे मॉक ड्रिल करत असताना लोक घराबाहेर असल्याने हजारो जीव वाचले आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
19 सप्टेंबर 1985 रोजी मेक्सिको सिटीत 8.1 तीव्रतेचा भूकंप होत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर शेकडो इमारतींना नुकसान पोहोचले होते. 2017 मध्ये याच तारखेला 7.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता आणि त्यात 370 जणर मृत्युमुखी पडले होते. याचमुळे मेक्सिकोतील लोक 19 सप्टेंबरला शापित दिन मानतात.
1985 मधील भूकंप
19 सप्टेंबर 1985 रोजी मेक्सिको सिटीत 8.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचे धक्के सुमारे 3 हजार किलोमीटर अंतरावरील लॉस एंजिलिसपर्यंत जाणवले होते. या भूकंपाने 10 हजारांहून अधिक बळी घेतले होते. तर 30 हजार लोक जखमी झाले आणि सुमारे 2.50 लाख लोक बेघर झाले होते.
2017 मधील भूकंप
मेक्सिकोमध्ये 19 सप्टेंबर 2017 रोजी 7.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. याचे केंद्र मेक्सिको सिटीपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या होत्या तर सुमारे 370 जणांना जीव गमवावा लागला होता.
पश्चिम किनाऱयावर त्सुनामीचा अलर्ट
सोमवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱयावर त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथून 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेक्सिको सिटीतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र मिचोआकन प्रांतातील कोलकोमनपासून 59 किलोमीटर अंतरावर 15 किलोमीटर खोल जमिनीत होते. तर भूकंपाच्या प्रभावामुळे 3 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा किनाऱयावर धडकू शकतात. कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वेडोर, अल साल्वाडोर, ग्वाटेमाला, होंडुरास, निकारागुआ, पनामा आणि पेरूच्या किनाऱयावर कमी तीव्रतेच्या त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.