ऑनलाईन टीम / तरुण भारत :
घर घेणाऱ्यांसाठी म्हाडाची खूशखबर आहे. म्हाडा लवकरच पुणे विभागासाठी 4 हजार 744 घरांची सोडत काढणार आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, ताथवडे, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणांचा समावेश असणार आहे. म्हाडाच्या घरांची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते, त्यामुळे अनेकांची म्हाडाच्या घरांना पसंती असते. त्यामुळे या सोडतीतून अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी नितीन माने-पाटील म्हणाले, पुणे विभागासाठी म्हाडाची 4 हजार 744 घरांची सोडत निघणार आहे. येत्या काही दिवसात याबाबतची जाहीरात प्रसिद्ध होणार असून, इच्छूकांना अर्ज भरता येणार आहे. गेल्या काही वर्षातील पुणे विभागातील ही दहावी सोडत असेल. तर मागील दोन वर्षात म्हाडाने काढलेली ही चौथी सोडत असेल. या सोडतीत पुणे विभागातील पुणे, पिंपरी-चिंचवड, ताथवडे, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणांचा समावेश असेल.
दरम्यान, म्हाडा दिवाळीत मुंबईमध्येही 3 हजार घरांची सोडत काढणार आहे. काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहाडी, गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पांना भेट देऊन कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी लवकरच या सदनिका पूर्ण होऊन नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील, असे म्हटले होते.
म्हाडा टाऊनशीप उभारणार
म्हाडा अंबरनाथमध्ये राज्यातील सर्वात मोठी टाऊनशीप उभारणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून तब्बल 200 एकर जागेचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. मुंबई उपनगरातील वाढती लोकसंख्या पाहता, डोंबिवली आणि कल्याणच्या पुढे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पर्यायी टाऊनशिप उभारण्याचा विचार केला जात आहे.