प्रतिनिधी /पणजी
म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर व उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर भाजप पक्षश्रेष्ठांच्या आदेशानुसार आज गुरुवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा पालिका संचालकाकडे सादर करणार आहेत.
चार दिवसांपूर्वी म्हापशाच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, दोन दिवसांत नगरसेविका केअल ब्रागांझा, अन्वी कोरगांवकर भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. या राजकीय डावपेचात आता नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष वायंगणकर नाराज ?
डॉ. बिचोलकर यांना नगराध्यक्षपद मिळावे म्हणून एक गट प्रयत्नशील आहे. नगरसेविका अन्वी आणि केअल ब्रागांझा यांनी भाजपात रितसर प्रवास केल्यास येथे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऐनवेळी नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितल्याने नगराध्यक्ष वायंगणकर नाराज झाल्या आहेत. आमदारांकडे काही नगरसेवकांनी धाव घेतल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.