प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा पालिकेतील प्रलंबित भत्ता वाढ तसेच इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर पासून म्हापसा पालिका कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याची माहिती युनियन कामगार नेते केशव प्रभू यांनी दिली. तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर म्हापसा पालिका कर्मचारी वर्ग आपल्या मागण्यासाठी आजपासून संपावर जात आहेत. सर्व पालिका कर्मचारी संपावर गेल्यास म्हापसा शहरात कर्मचारी अभावी म्हापशात मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती काही नगरसेवकांनी दै. तरुण भआरतशी बोलताना व्यक्त केली.
यासंदर्भात पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कांबळी म्हणाले की, जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांच्या म्हणण्यानुसार पंधरा दिवस संप पुढे ढकलला. मात्र पालिका प्रशासनाने आमचा इशारा दुर्लक्षित केला. नगराध्यक्षांनी पालिका मंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा करून निर्णय घेऊ अशी ग्वाही दिलेली त्यामुळे आम्ही दंडावर काळी पट्टी बांधून प्रतिकात्मक स्वरुपात संपावर होतो. एवढे करूनही आमच्या मागण्यांकडे पालिका मंडळाने दखल घेतली नाही. असे ते म्हणाले.
मागण्या मान्य करण्यास नगराध्यक्षाचा नकार
यापश्नी गुरुवारी दि. 20 रोजी सायंकाळी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात संघटेनेचे नेते केशव प्रभू यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बैठकीत नगराध्यक्षांनी मागण्या मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संपावर जाण्याशिवाय आमच्यासमोर दूसरा पर्याय नव्हता असे ते म्हणाले.
नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, पालिका कर्मचाऱयांच्या मागणीपत्रासंदर्भात चर्चेसाठी 31 ऑक्टोबरला पालिका मंडळाची बैठक बोलावली आहे. मात्र या आधीच कर्मचाऱयांनी संपावर जाण्याचे ठरविले आहे. हा त्यांचा निर्णय असून आम्ही काहीही बोलू शकत नाही. याप्रश्नी सहाय्यक कामगार आयुक्त मिलिंद गोवेकर यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली. यात कामगारांच्या प्रतिनिधींना आम्ही समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. येत्या 31 ऑक्टोबरला होणाऱया बैठकीत कामगारांच्या प्रश्नाविषयी चर्चेसाठी नोटीस काढली आहे. मात्र त्यापूर्वीच संपावर जात आहे हि गोष्ट गंभीर आहे असे नगराध्यक्षा म्हणाल्या.