उपसभापती जोशुआ डिसोझा यांची माहिती : इतर नगरसेवकांनाही दिलेला शब्द पाळावा लागेल : विरिष्ठांशी चर्चा करून निणर्य
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशाच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर व उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांना करारानुसार वर्षभराचा अवधी देण्यात आला होता, त्यानुसार त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपला. पण त्यावेळी कोविड काळ होता शिवाय निवडणुकाहा असल्यामुळे बदल होऊ शकला नाही. विधानसभा, पंचायत निवडणुका झाल्यानंतर चतुर्थी काळात थोडावेळ लागला खरा मात्र या दोघांच्या पायउताराबाबत पुढील दहा दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्याशी बोलणी करूनच हा निर्णय होईल, अशी माहिती म्हापशाचे आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
उपसभापती जोशुआ विदेशातून काल राज्यात परतले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे आता म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना या दोन दिवसांत आपला राजीनामा द्यावा लागेल हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.
इतर नगरसेवकांना दिलेल्या शब्दाचे पालन होण गरजचे!
म्हापशात नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची खरोखरच गरज आहे की, आज आहे त्यात समाधान आहे असा प्रश्न जोशुआ यांनी केला असता ते म्हणाले, आमच्या गटात 13 सदस्य आहेत. दोघांचा आम्हाला बाहेरून पाठिंबा आहे. शिवाय आमच्याकडे वरिष्ठ सदस्यही आहेत. आम्ही त्यांनाही शब्द दिलेला आहे की त्यांनाही यात सामावून घेण्यात येईल. तो शब्द आम्हाला पाळावा लागेल. त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपसभापतींनी दिली.
सर्व नगरसेवक, पालिका अधिकाऱयांची एकत्रित बैठक घेणार
आता नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होणार त्यांची कारकीर्दही एक वर्षांची असेल. आम्हाला नवीन पूर्णवेळ मुख्याधिकारी आलेला आहे. त्यांचे कार्य चांगले आहे, असे सर्वजणांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत आपण सर्व नगरसेवक व प्रशासनासोबत एकत्रित बैठक घेणार असून त्या बैठकीत आढावा घेणार असल्याची माहिती यावेळी उपसभापती जोशुआ यांनी दिली. मात्र नवीन नगराध्यक्ष कोण असेल याबाबत अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व सदस्य भाजपचेच आहे. त्या सर्वांना भाजपचे नियम व अटी माहीत आहेत.
त्या आठ आमदारांचे भाजपात स्वागत- उपसभापती
काँग्रेसचे आठ आमदार भाजपात येणार हे आम्हाला चतुर्थीपूर्वीच समजले होते. आणि ते साहजिकच होते. हे काही आकस्मिक असे काही नव्हते हे आज नाही तर उद्या होणारच होते. अखेर तो निर्णय झालाच. यामुळे आमचे संख्याबळ वाढून पक्षाची शक्ती वाढली. हा निर्णय पक्षाचा आहे आणि पक्ष काही जो निर्णय घेतो तो आम्हाला मानावाच लागतो. त्या आठ जणांच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे उपसभापती जोशुआ यांनी सांगितले.
डॉ. नूतन बिचोलकर, प्रिया मिशाळ यांचे नावे चर्चेत
म्हापसा पालिकेच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनी भाजपात रितसर प्रवेश केल्यावर भावी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यात आता बदल होऊन प्रिया मिशाळ यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहे. उपनगराध्यक्षाची माळ नगरसेवक सुशांत हरमलकर यांच्या गळय़ात पडण्याची शक्यता आहे. शिवाय मार्केट समितीच्या अध्यक्षपदी आशीर्वाद खोर्जुवेकर यांचे नाव चर्चेत असले तरी उपसभापती जोशुआ कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात यावर सर्व अवलंबून आहे.
…तर लोबो मोठय़ा पदावर असले असते : जोशुआ
आमदार मायकल लोबो व डिलायला लोबो भाजपात आल्या यावर प्रतिक्रिया देताना उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले की, मायकल पक्ष सोडून गेले होते त्यांना पुन्हा पक्षात यावे लागले. आम्ही पक्षाचे निष्ठावंत आहोत, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत. लोबो पुन्हा पक्षात आले त्यांना आपली काहीतरी चूक समजून आल्यावर त्यांनी जो निर्णय घेतला असावा. खरी प्रतिक्रिया म्हटल्यास लोबो हे आमचेच भाजपचेच आहेत. यापूवीही आपण तेच म्हटले होते. पक्षात त्यांचे स्वागत आहे आणि तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही उपसभापती जोशुआ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षातच असते तर लोबो आज मोठय़ा पदावर असले असते हे सर्वांनाच माहीत आहे, असे ते शेवटी म्हणाले.