विशेष प्रतिनिधी /पणजी
विरोधी पक्षनेते मायकल लोबो हे काल मंगळवारी येथून वालाकिणी येथील वालांकिणीच्या वार्षिक फेस्तमध्ये सहभागी होण्यासाठी तामिळनाडू येथे गेले आहेत. ते सहकुटुंब गेले असून वालांकिणी सायबिणीचा आशीर्वाद घेणार आहेत.
मायकल लोबो हे येथून बेंगळुरु येथे विमानाने गेले. तेथील विमानतळावरून दैनिक तरुण भरतशी बोलताना त्यांनी सांगितले की, आमची वार्षिकच वालांकिणी सायबिणीच्या फेस्ताला फेरी असते. आपण केवळ देवीकडून आशीर्वाद मागून घेणार आहे. गोव्यातील राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्मय नसते. त्यामुळे ज्या कोणत्या अफवा असतील त्यावर आपण कोणतेही भाष्य करणार नाही. आपण 9 सप्टेंबर रोजी पुन्हा गोव्यात पोहोचणार असून त्यानंतर काय होतेय ते पाहू, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत मायकल लोबो हे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची अफवा एका वृत्तपत्राने पसरवली होती, त्याविषयी बोलताना मायकल लोबो यांनी सांगितले की ज्यांना अफवा पसरायचे आहेत त्यांना अवश्य अफवा पसरू द्या. आपण या संदर्भात कधी विचार देखील केला नाही. अशा कल्पना जर कोणी रचित असेल तर त्याला त्याचा आनंद घेऊ द्या. आपले राजकारण स्वच्छ आणि सरळ आहे.
काँग्रेस पक्ष विधीमंडळ गट नेत्याची निवड करणार असल्याचे आपल्याला समजले आहे, प्रत्यक्षात मात्र खरोखरच कोणी नवी दिल्लीहून येणार की नाही, याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही. असे निवेदन करून लोबो यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.