नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांचा ठपका : चौकशी समितीचा अहवाल विधानसभेत सादर
प्रतिनिधी /पणजी
कळंगूट, कांदोळी, हडफडे, नागवे, पर्रा भागातील बाहय़ विकास आराखडय़ांच्या (ओडीपी) परिसरात बेकायदेशीरपणे भू-रुपांतर आणि जमिनी बळकावणे व विकसित करण्याच्या प्रकरणी नगरनियोजन खात्याने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल संबंधित खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी राज्य विधानसभेत सादर केला. त्यानुसार मायकल लाबो यांनी 27 हजार 647 चौ. मी. जमीन ही स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावावर केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई अटळ असल्याचे राणे यांनी सांगितले.
राज्य विधानसभेत काल मंगळवारी दुपारी राणे यांनी या संदर्भातील अहवाल सभागृहात पटलावर ठेवला. यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आपण यात कोणी बेकायदेशीर कृत्ये केलेली आहेत त्यांची नावे काही जाहीर करणार नाहीत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ती सर्वानाच कळतील, असे ते म्हणाले.
लोबोकडून 27 हजार चौ. मी. रुपांतरण
या अहवालात मायकल लाबो यांनी 27 हजार 647 चौ. मी. जमीन ही स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावावर केली आहे. त्या जमिनीचे रुपांतरण करून घेतले आहे. शिवाय कळंगूट, कांदोळी, हडफडे, पर्रा, येथील बाहय़ विकास आरखडय़ाअंतर्गत 16 लाख 94 हजार चौ. मी. जमिनीचे रुपांतरण केल्याचे उघड झाले आहे.
जमिनी रुपांतरणातून बाहेर काढल्या जातील
मंत्री विश्वजित राणे यांनी या सर्व जमिनी रुपांतरणातून पुन्हा बाहेर काढल्या जातील आणि एकूण बेकायदेशीर व्यवहार त्रीसदस्यीय अधिकाऱयांमार्फत चौकशी केली जाईल. एवढे करून न थांबता आपण जो काही निर्णय घेतलेला आहे. तो न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केला जाईल, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मुख्य सचिव, नगरनियोजन, सचिव व इतर एक अधिकारी अशा आयएएस अधिकाऱयांची समिती या बाबतीत अभ्यास करीत होती. या समितीने कळंगूट व शिवोली मतदारसंघातील जमिनींचे बेकायदेशीर रुपांतरण तसेच बेकायदा बांधकामे केलेली आहेत, शिवाय अधिकाऱयांवर दादागिरी करून कामे करून अहवाल त्यांनी तयार केला. आपण तो सभागृहाच्या पटलावर ठेवलेला आहे, असे राणे म्हणाले.
या अहवालातील काही भाग आपण टप्प्याटप्प्याने उघड करणार आहे, असा इशाराच मंत्र्यांनी दिला. वास्को व कळंगूट मतदारसंघातील बेकायदा जमिनींचे व्यवहारांची सखोल चौकशी व कारवाई केली जाईल. ज्यांनी बेकायदा कृत्य केलेले आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार व त्यांच्या जमिनी सरकार आपल्या ताब्यात घेईल, असेही मंत्री पुढे म्हणाले.
नगर नियोजनमंत्र्यांकडून मायकल लोबो टार्गेट
नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना टार्गेट ठरवून गेल्या दोन महिन्यात त्यांच्या मतदारसंघातील जमिनींचे बेकायदा व्यवहार उघड करणार असे जाहीर केले होते. त्यांना उद्दीष्ट ठेवून हडफडे, नागवे, कळंगूट, वगैरे परिसरातील जमिनीच्या व्यवहारांच्या बेकायदा कृत्यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल सभागृहात सादर केला. त्यात लोबो यांनी जमीन रुपांतरण केले, त्याची माहिती देण्यात आली आहे.