शाळेत काम करणाऱयांवर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले आहे. अनंतनाग जिह्यातील बोंडियालगाम येथे दहशतवाद्यांनी दोन स्थलांतरित मजुरांवर गोळीबार केल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मजूर एका खासगी शाळेत काम करत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे मजूर बिहार आणि नेपाळचे रहिवासी आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.
पुंछ सेक्टरमध्ये 3 दहशतवादी ठार
या हल्ल्यापूर्वी गुरुवारी लष्कराच्या जवानांनी पुंछ सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱया तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न केला असता प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनीही गोळीबार सुरू केला. यादरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर झडतीदरम्यान लष्कराने पिस्तूल, रायफलसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला. त्यापूर्वी मंगळवारी पुलवामाच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. खोऱयातील काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांवर हल्ले करणारा लष्कर कमांडर मुख्तार भट याचाही यात समावेश आहे. त्याच्यासोबत पुलवामाचा सकलेन मुश्ताक आणि पाकिस्तानी दहशतवादी मुशफिक यांचाही खात्मा झाला आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा मोठा साठाही जप्त केला आहे. हे दहशतवादी सुरक्षा दलांच्या कॅम्पमध्ये फिदाईन हल्ल्याची योजना आखत होते.