प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सोसायटीच्या अनगोळ शाखेचे कांता बिल्डिंग, अनगोळ मेन रोड येथे स्थलांतर झाले आहे. बुधवार दि. 18 रोजी लोकमान्यचे ज्येष्ठ ग्राहक वसंतराव दांडेकर यांच्या हस्ते फीत कापून नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, दीपक गुरूंग, रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, आदर्श अंकले उपस्थित होते.
प्रारंभी दांडेकर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. त्यानंतर पंढरी परब यांनी स्वागत केले. लोकमान्यचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी देवो भव या भावनेने ग्राहकांकडे पाहिले जाते आणि विनम्र सेवा दिली जाते, असे त्यांनी सांगितले.
वसंतराव दांडेकर यांनी लोकमान्यच्या बाबतीत ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ असे म्हणावे लागेल. किरण ठाकुर यांनी लोकमान्यची स्थापना करून अनेकांना रोजगार दिला आहे. लोकमान्यमध्ये ग्राहकांना आपुलकीने वागविले जाते आणि येथे आपल्या ठेवी सुरक्षित आहेत, असे सांगितले.
शाखा व्यवस्थापक प्रसाद नाडगौडा यांनी दांडेकर यांचे स्वागत केले. अजित गरगट्टी यांनी त्यांचा सत्कार केला. प्रसाद नाडगौडा, सुहास सुवारे, प्राची शेणवी, अनिकेत भोगण यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले. मधुकर कुलकर्णी यांनी आभार मानले.