पालक-एसडीएमसीत नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
कन्नड शाळेचे मराठी शाळेमध्ये स्थलांतर करण्याचा प्रयत्न बेळगाव शहरात सुरू आहे. गणपत गल्ली येथील मराठी शाळा क्र. 2 मध्ये कांदा मार्केट येथील महात्मा फुले भाजी मार्केट इमारतीत सुरू असलेली कन्नड प्राथमिक शाळा क्र. 10 या शाळेचे स्थलांतर करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून गणपत गल्ली येथील शाळेत कन्नड शाळेचे वर्ग भरविण्यात येत असून यामुळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. मराठी शाळेचे अस्तित्व मिटविण्याचा हा प्रयत्न असून त्याला मराठी भाषिकांनी वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
गणपत गल्ली येथील मराठी शाळा क्र. 2 मध्ये यापूर्वी केंद्रीय विद्यालय घुसडण्यात आले होते. मराठीची कावीळ असणाऱया काही शिक्षणाधिकाऱयांकडून मराठी शाळांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. केंद्रीय विद्यालय येथून दुसरीकडे गेल्यानंतर काही दिवसांतच ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर चव्हाट गल्ली येथून गणपत गल्लीत करण्यात आले. हे कमी की काय म्हणून आता दुसरीकडील कन्नड शाळा या शाळेमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे.
कांदा मार्केट येथील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दोन कन्नड शाळा आहेत. यापैकी एका कन्नड शाळेत पावसाचे पाणी शिरत असल्याचे कारण देत या शाळेतील विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांपूर्वी गणपत गल्ली येथील शाळेत हलविण्यात आले. गणपत गल्ली येथील शाळेत एकूण 13 खोल्या असून यापैकी आठ खोल्या ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. उर्वरित खोल्यांमध्ये ऑफिस स्टोअर, अंगणवाडी यासाठी देण्यात आल्या आहेत. केवळ दोन खोल्यांमध्ये मराठी शाळा भरविली जात होती. आता यातही कपात करण्यात आली असून केवळ एका खोलीमध्ये वर्ग भरविण्यात येत आहेत.
मराठी विद्यार्थी चालतील…
सध्या गणपत गल्ली येथे एकूण तीन मराठी शाळा कार्यरत आहेत. त्यांच्या इमारतीही जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही बऱयाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या शाळांमध्ये कोंबडी बाजार येथील मराठी शाळा व कांबळी खूट येथील प्राथमिक शाळेचा समावेश आहे. या शाळांचे 2 नंबर शाळेमधील इमारतीत स्थलांतर करण्यास येथील शाळा कमिटी अनुकूल आहे. कारण, एकाच माध्यमाच्या विद्यार्थ्यांमुळे त्यामध्ये एकजिनसीपणा येतो, असे त्यांचे म्हणणे आहे. पण कन्नड शाळेचे स्थलांतर मराठी शाळेत नको, अशी पालकांचीही मागणी आहे.