Tarun Bharat

सुतारवाडय़ावर दरवर्षीच स्थलांतराची वेळ

पर्यायी जागेची नुसतीच चर्चा, पूर गेला विषय बंद

Advertisements

कोल्हापूर /विनोद सावंत

दसरा चौकातील सुतारवाडा परिसर म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये पुराचे पाणी प्रथम येणारा परिसर म्हणून परिचित झाला आहे. दरवर्षी येथील नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागते. परिणामी पावसामध्ये 300 नागरिकांचा जीव टांगणीला असतो. तसेच महापालिकेच्या यंत्रणेचीही तारांबळ उडते. दरवर्षी येथील नागरिकांच्या पर्यायी जागेचा विषय चर्चेत येतो. पावसाळय़ानंतर मात्र, विषय बंद होतो.

दसरा चौकनजीक चित्रदुर्ग मठाच्या जागेवर सुतारवाडा परिसर आहे. 70 वर्षापासून येथे सर्वसामान्य कुटुंबातील लोक राहत आहेत. सध्या 60 घरे आणि 10 ते 15 व्यावसायिक असे मिळून 350 ते 400 नागरिक येथे वास्तवास आहेत. जयंती नाला लगत वस्ती असल्याने दरवर्षी पावसात पंचगंगेची पातळी वाढतच शहरात सर्वत प्रथम या ठिकाणी पुराचे पाणी शिरते. त्यामुळे महापालिकेचे या परिसरावर विशेष लक्ष असते.

कोल्हापुरात 2019 आणि 2022 मध्ये महापूर आल्यानंतर दोन महिन्यापेक्षा जास्त काळ येथील नागरिकांना सुतारवाडा सोडून महापालिकेच्या निवारा केंद्रात रहावे लागले. महापूर ओसरल्यानंतर घरांमध्ये गेल्यानंतर बरेच दिवस दुर्गंधीचा सामान करावा लागला. घरासह साहित्याचेही मोठे नुकसान झाले. शासनाच्या तुटपुंज्या आर्थिक मदतीमधून याची भरपाई झाली नाही, हेही वास्तव आहे.

दोन्ही महापुरावेळी येथील नागरिकांना पर्यायी जागा देऊन कायमचे स्थलांतर करण्याचा विषय चर्चेत आला. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावरून पूर्ण सहकार्य केले जाईल, असा रहिवाशींना शब्दही दिला. महापालिका प्रशासनाने रहिवाशी यादी तयार केली. पर्यायी जागेवर जाण्यासाठी सहय़ाही घेतल्या. वर्ष झाले पुन्हा महापूराचा धोका निर्माण झाला तरी यावर कार्यवाही नाही.

खासगी जागा असल्याने मर्यादा

सुतारवाडा परिसर चित्रदुर्ग मठाच्या मालकीचा खासगी जागेत आहे. भाडेतत्वार येथील लोकांना ते राहण्यास दिले आहे. यामधील काही रहिवाशी भाडे पोस्टाने देतात. तर काही तेही देत नाही. खासगी जागा असल्यामुळे येथील रहिवाशीना पर्यायी जागा देणे, घरे बांधून देण्यास महापालिका प्रशासनावर मर्यादा येत आहेत.

मध्यमार्ग काढण्याची गरज

सुतारवाडय़ातील दरवर्षी पावसामध्ये येणारी समस्या कायमची सोडविण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि रहिवाशी यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. पर्यायी जागा आणि बांधकाम खर्च याबाबत विशेषबाब म्हणून निर्णय झाला पाहिजे. तरच यावर मार्ग निघणार आहे. अन्यथा दरवर्षी रहिवाशींसह मनपा यंत्रणावर ताण ठरलेला आहे.

सुतारवाड जागेची मालकी – चित्रदुर्ग मठ
घरांची उभारणी – 1952
एकूण घरे – 60
नागरिकांची संख्या – 350 ते 400
पूर कालावधीत स्थलांतर – चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डींग हॉल

दरवर्षी पूरची धास्ती ठरलेली
पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 43 फुटांवर आल्यावर सुतारवाडा परिसरात पुराचे पाणी येते. सलग चार वर्ष मुसळधार पावसामुळे पूर स्थिती आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर येथील नागरीक कमालीच्या तणावात असतात.

Related Stories

महे येथे वन्य प्राण्याचा बकऱ्यांवर हल्ला; सुमारे दीड लाखांचे नुकसान

Abhijeet Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल दरवाढीचे शतकवीर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावात सोमवारपासून दहा दिवसाचा जनता कर्फ्यू

Abhijeet Shinde

Petrol-Diesel Price : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Abhijeet Shinde

अंबाबाई भक्तांना डाक विभागाकडुन 10 हजार कापडी प्रसाद थैली वाटप

Abhijeet Shinde

कुंभोज येथील ‘ते’ काम निकृष्ट दर्जाचे; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Sumit Tambekar
error: Content is protected !!