ढोल-ताशा पोवाड्याने रंगणार सोहळा : महाप्रसादाची जय्यत तयारी
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वाभिमानी मराठी भाषिकांमधून रविवार दि. 19 रोजी राजहंसगडावर दुग्धाभिषेक सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत ऐतिहासिक राजहंसगडावर हा सोहळा होणार आहे. बेळगाव, खानापूर, निपाणी या परिसरातून हजारो शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या भव्य शिवमूर्तीवर दुग्धाभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक केला जाणार आहे. रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. प्रत्येक मराठी भाषिकाचा या सोहळ्याला हातभार लागावा यादृष्टीने नागरिकांच्या देणगीतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राजहंसगडावर आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली असून गडाच्या पायथ्यापासून शोभायात्राही काढली जाणार आहे. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सकाळी 8 ते 10 यावेळेत दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. रायगड येथील के. एन. पाटील गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली विधिवत पूजन केले जाईल. दुग्धाभिषेक झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
महाप्रसादाची जय्यत तयारी
रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे राजहंसगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाप्रसादाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी महाप्रसादाचे सर्व साहित्य शहर समितीच्या कार्यालयातून राजहंसगडावर नेण्यात आले. राजहंसगडाच्या पायथ्याशी अंदाजे 10 हजार शिवभक्त महाप्रसाद घेतील, अशी व्यवस्था म. ए. समितीकडून करण्यात आली आहे.