दररोज 16 लाख लिटर दूध उत्पादन, जनावरांच्या संख्येतही वाढ, दुधाबरोबर उपपदार्थांनाही अधिक मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
पशुसंगोपन खात्यामार्फत राबविलेल्या विविध योजना, वेळोवेळी केलेली आरोग्य तपासणी आणि जनावरांचे प्रदर्शन यामुळे पशुसंगोपनला प्रोत्साहन मिळण्याबरोबर दूध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. जिल्हय़ात दररोज 35 हजार लिटर दूध उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढले आहे.
अलीकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. जिल्हय़ात तब्बल 28 लाख 9 हजार 109 इतकी जनावरे आहेत. त्यामध्ये गायी, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ा, घोडा, कुत्रा, मांजर आदींचा समावेश आहे. विशेषतः गायी, म्हशीपासून दुधाचे उत्पादन होत असते. गावोगावी असलेल्या दूध डेअऱयांतून दुधाचे संकलन केले जाते आणि ते पुढे दूध संघांना पाठविले जाते. काहींचा उदरनिर्वाह दुधावरच चालतो. त्यामुळे गायी, म्हशी त्यांना आधार ठरल्या आहेत.
अमृत योजना आणि पशुभाग्य योजनेंतर्गत पशुपालकांना जनावरे खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. त्याबरोबर दूध संघ, बँका आणि डेअऱयांकडून कर्ज उपलब्ध केले जाते. त्यामुळे दरवषी 18 टक्के दूध उत्पादनात वाढ होत आहे. जिल्हय़ात दररोज सुमारे 16 लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. त्यापैकी 1 ते 2 लाख लिटर दूध कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) ला दिले जाते. उर्वरित दूध महाराष्ट्र, गोवा येथील दूधसंस्थांना दिले जाते. तसेच दररोज घरोघरी जाऊन गवळी बांधव देखील दूध देतात.
दूध संघामध्ये अग्रगण्य मानल्या जाणाऱया गोकूळ दूध संघालाही जिल्हय़ातून अधिक पुरवठा होत असतो. विशेषतः दुधाला चांगला भाव आणि बोनस मिळत असल्याने गोकूळला दूध पाठविणाऱया डेअरींची संख्या अधिक आहे. कोरोना काळात बाजारपेठ, हॉटेल, शाळा आणि इतर व्यवहार बंद राहिल्याने दुधाची उचल थांबली होती. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे काय करावे? असा प्रश्न देखील दूध संघाला पडला होता. मात्र आता सर्व व्यवहार सुरू झाल्याने दुधाची विक्रीही सुरळीत झाली आहे. तसेच दूध दरातही वाढ झाली आहे. बाजारात दूधाबरोबर उपपदार्थांनादेखील अधिक मागणी असल्याने पशुपालकांना दूध व्यवसाय फायदेशीर ठरत आहे.
राष्ट्रीय गोकूळ मिशन योजनेंतर्गत जनावरांना सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामध्ये कृत्रिम गर्भधारणा, जंतनाशक औषधे आणि टॉनिकची औषधे पुरविली जात आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांची संख्या वाढली आहे. शिवाय दूध क्षमताही वाढली आहे. तसेच जातिवंत जनावरे पशुपालकांच्या घरी तयार होत
असल्याने दूध उत्पादनात वाढ झाली आहे.