Tarun Bharat

मिल्कोटेस्टरचा पासवर्ड दुध संस्थांच्या हातात?

पासवर्डद्वारे मिल्कोटेस्टरमध्ये फेरफार करुन फॅट कमी केले जात असल्याच्या दुध उत्पादकांची तक्रार

कोल्हापूर/कृष्णात चौगुले

दुधाचे फॅट, एसएनएफ, दुधात मिसळलेल्या पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी प्राथमिक दुध संस्थांकडून अद्ययावत मिल्कोटेस्टरचा वापर केला जात असला तरी मिल्कोटेस्टरमध्ये फेरफार करून फॅट कमी केले जात असल्याच्या दुध उत्पादकांच्या तक्रारी आहेत. याचा थेट आर्थिक फटका दुध उत्पादकांना बसत आहे. फेरफार करण्यासाठी पासवर्ड माहित असणे गरजेचे असताना हा गोपनीय पासवर्ड संस्थाचालकांच्या हातात जातोच कसा? असा सवाल करीत फॅट कमी करुन मधल्यामध्ये मलई खाणाऱया दुध संस्थाच्याविरोधात दुध उत्पादकांच्यातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

दरम्यान, पासवर्डचा गोलमाल गोकुळच्या काही चाणाक्ष कर्मचाऱयांनी व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर गेल्या काही दिवसापासून जुना पासवर्ड डिलीट करुन नवीन पासवर्ड देण्याचे काम सुरु आहे. या कामात देखील काही ‘चतुर’ दुध संस्थाचालक अडथळे निर्माण करीत असून अद्यापही 75 टक्के दूध संस्थामध्ये पासवर्ड बदलण्याचे काम शिल्लक आहे. दुध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने हे काम गतीने करण्याची गरज आहे.

जिह्यातील सुमारे 50 टक्केहून अधिक दुध संस्थांमध्ये अशा पद्धतीने मिल्कोटेस्टरमध्ये फेरफार केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासंदर्भात गोकुळ दुध संघाकडे तक्रारीही आल्या आहेत. दरम्यान वैधमापनशास्त्र विभागाकडून मिल्कोटेस्टरची पडताळणी अथवा तपासणी होत नसल्यामुळे, त्याची गुणवत्ता कोण तपासणार हा देखील एक प्रश्न आहे.

काही दुध संस्थामध्ये अद्यापही जुनेच मिल्कोटेस्टर आहेत. 9.0 फॅट असणाऱया दूधास 7.0 ते 8.0 फॅट दर्शवल्यामुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 ते 15 रूपयांचा तोटा सहन करावा लागतो. जुन्या पद्धतीचा मिल्कोटेस्टर न खोलता केवळ बाहेरील बाजूस असलेला एक स्क्रू फिरवून फॅट कमी-जास्त करण्याची सोय आहे. बहुतांशी संस्था चालकांकडून अशा प्रकारे फेरफार केले जात आहेत.

फॅट तपासण्याच्या नावाखाली 50 ते 100 मिलीवर डल्ला

फॅट तपासण्यासाठी उत्पादकांकडून घेतले जाणारे 50 ते 100 मि.ली.दूध परत न देता ते संस्थेच्या कॅनमध्येच स्वतंत्रपणे ओतले जाते. दोन वर्षांपूर्वी या विरोधात तक्रार झाल्यानंतर तत्कालिन सहाय्यक निबंधकांनी (दूग्ध) फॅट तपासण्यासाठी केवळ 5 ते 20 मि.ली. दूध घेण्याच्या प्राथमिक दूध संस्थांना सूचना द्याव्यात असे आदेश गोकुळ दूध संघाला दिले होते. त्यानुसार ‘गोकुळ’नेही सर्व प्राथमिक दूध संघांना पत्र पाठविले होते. पण आजतागायत या सूचनेनुसार कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.

10 मि.ली. अचूकतेचे वजन काटे आवश्यक

दूध संस्थातील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे हे 100 मि.ली अचूकता (ई व्हॅल्यू / ऍक्युरसी) वर्गाचे आहेत. त्यामुळे या वजन काटय़ावरील कॅनमध्ये दूध ओतल्यानंतर ते दूध 910 ते 950 मि.ली दरम्यान झाल्यास ते केवळ 900 मि.ली.दर्शवले जाते. परिणामी या ठिकाणीही उत्पादकांना सुमारे 50 ते 75 मि.लीचा फटका बसतो. त्यामुळे राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकांनी लाखो दूध उत्पादक कुटूंबियांच्या उपजिविकेचे साधन असणाऱया दूध संस्थामध्ये 10 मि.ली. अचुकतेचे वजन काटे वापरण्यास बंधनकारक करणे आवश्यक आहे. तशी मागणी वैधमापनशास्त्र विभागाचे तत्कलिन नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्याकडे चार वर्षापूर्वी केली होती. पण दूध हा पातळ पदार्थ असल्यामुळे त्याचे वजन वजनकाटय़ावर न करता लिटरच्या प्रमाणित मापाने मोजमाप करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या संस्था दूध संकलनासाठी वजनकाटय़ाचा वापर करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही राज्यातील सर्व सहाय्यक नियंत्रकांना दिले आहेत. पण आजही दुधाचे मोजमाप हे ईलेक्ट्रॉनिक वजन काटय़ावरच केले जात असून वैधमापनशास्त्र विभागाकडून मात्र संस्थांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

अनेक दुध संस्थांकडून शेतकऱयांना अर्थिक आधार

काही दुध संस्थांकडून मिल्कोटेस्टर आणि वजनकाटय़ाद्वारे शेतकऱयांच्या दुधावरील लोणी खाण्याचा धंदा सुरु असला तरी दुसऱया बाजूस उल्लेखनीय कामकाज करणाऱया संस्थांचीही कमी नाही. अचूक वजन, फॅटच्या माध्यमातून शेतकऱयांच्या घामाचा एक एक पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. गौरी-गणपती आणि दिवाळीच्या सणामध्ये उत्पादकांना गोकुळ दुध संघाकडून ठेव आणि फरकाची रक्कम दिली जाते. त्या रकमेत दुध संस्थेकडून काही रक्कम जमा करून उत्पादकांना अधिकाधिक फायदा कसा होईल याचा विचार केला जातो. सर्वच दुध संस्थांनी आपला कारभार अशा पद्धतीने पारदर्शी ठेवल्यास शेतकऱयांना मोठा अर्थिक आधार मिळणार आहे.

Related Stories

मुंबईत शुक्रवारी मराठा आरक्षण गोलमेज परिषद

Archana Banage

टाेप गायराण बेकायदेशीर अतिक्रमण प्रश्नी उपाेषण सुरु

Archana Banage

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह संख्या 507 वर

Archana Banage

जिल्हा परिषदेतील ७७ कर्मचारी लेट कमर्स

Archana Banage

त्रावणकोर राजकुमारींची न्यू पॅलेसला सदिच्छा भेट

Abhijeet Khandekar

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा रविवारपासून

Abhijeet Khandekar